
पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षणाची मदत; मू. जे. महाविद्यालयाचा सामाजिक उपक्रम
पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षणाची मदत; मू. जे. महाविद्यालयाचा सामाजिक उपक्रम
पाचोरा येथील एम.एम. कॉलेजच्या १६२ विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय साहित्य व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तके वाटप
जळगाव : पाचोरा तालुक्यात सप्टेंबर महिन्यात आलेल्या महापुरामुळे शैक्षणिक नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे करण्यात आला. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील १६२ पूरग्रस्त विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय दप्तर, वह्या, पेन यांसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
हा वाटप कार्यक्रम संबंधित संस्थेचे चेअरमन मा. श्री. नानासाहेब संजयजी वाघ, व्हा. चेअरमन मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक मा. श्री. आप्पासाहेब सतीश चौधरी, मा. श्री. दादासाहेब डॉ. जयंतराव पाटील, तसेच जळगाव येथील मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. देवेंद्र इंगळे, मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता व इंग्रजी विभागप्रमुख मा. प्रा. डॉ. भूपेंद्र केसूर, मा. प्रा. डॉ. जुगलकिशोर दुबे, मा. प्रा. डॉ. विजय लोहार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी एम.एम. कॉलेजचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष बी. पाटील, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. वासुदेव एस. वले व मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील यांच्या शुभहस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले.
याच उपक्रमांतर्गत मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाकडून पाचोरा येथील महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाला विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी UPSC व MPSC सामान्यज्ञान मार्गदर्शनाची पुस्तके भेट देण्यात आली.
केसीई सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. नंदकुमार जी. बेंडाळे यांच्या प्रोत्साहनामुळे आणि मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. एस. एन. भारंबे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. कार्यक्रमात मा. श्री. नानासाहेब संजयजी वाघ यांनी विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने अभ्यास करून अधिकारी होण्याचे ध्येय ठेवावे, असे प्रेरणादायी आवाहन केले. तर मा. प्रा. डॉ. भूपेंद्र केसूर यांनी विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करत जिद्द, चिकाटी आणि परिश्रमांच्या जोरावर यशस्वी वाटचाल करावी, असा संदेश दिला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम