पूर्वमौसमी पावसाचा जोर वाढला : राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

बातमी शेअर करा...

पूर्वमौसमी पावसाचा जोर वाढला : राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

जळगाव (प्रतिनिधी) : राज्यात पूर्वमौसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, येत्या ४८ तासांत अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मान्सूनची लवकर एंट्रीची शक्यता

नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) वाटचाल वेगाने सुरू असून, पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सध्या मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदिव-कोमरीन क्षेत्र, दक्षिण व मध्य बंगालच्या उपसागरात आणि ईशान्य बंगाल उपसागरात दाखल झाला आहे. त्यामुळे यंदा मान्सून वेळेआधी केरळमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यातील जळगाव, धुळे, नंदुरबार, धाराशिव, सोलापूर, जालना, अकोला, अमरावती, लातूर, बुलढाणा, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान खात्याच्या सतत बदलणाऱ्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी स्थानिक प्रशासनाचे निर्देश आणि अपडेट्सकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम