पॅट अंतर्गत संकलित मूल्यांकन परीक्षा १५ एप्रिलपर्यंत घेण्याची शिक्षक परिषदेची मागणी

शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन सादर

बातमी शेअर करा...

पॅट अंतर्गत संकलित मूल्यांकन परीक्षा १५ एप्रिलपर्यंत घेण्याची शिक्षक परिषदेची मागणी

शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन सादर

धुळे प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या धुळे शाखेने इयत्ता १ ली ते ९ वीच्या वार्षिक/पॅट अंतर्गत संकलित मूल्यांकन चाचणी दोनचे वेळापत्रक बदलून सर्व परीक्षा १५ एप्रिलपर्यंत घेण्याची मागणी केली आहे. या संदर्भात शिक्षण अधिकारी (माध्यमिक) यांना निवेदन देण्यात आले.

राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता ३ री ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (पॅट) आयोजन करण्यात येते. सध्या संकलित मूल्यांकन चाचणी दोनचे वेळापत्रक निर्गमित केले असून, या चाचण्या २५ एप्रिलपर्यंत घेण्याचे आदेश आहेत.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मते, २५ एप्रिल रोजी शेवटचा पेपर असल्याने त्यानंतर ४ ते ५ दिवसांत उत्तरपत्रिका तपासणे, संकलित निकाल तयार करणे, प्रगती पुस्तके लिहिणे इत्यादी कामे पूर्ण करणे अवघड आहे. माध्यमिक शाळांमध्ये विषयानुसार शिक्षक असतात आणि एका शिक्षकाकडे किमान ४ ते ५ विषयांचा कार्यभार असतो. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासून निकाल तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही.

तसेच, राज्यातील धुळे जिल्ह्यासह काही तालुक्यांमध्ये कडक ऊन, पिण्याच्या पाण्याची टंचाई या सर्व गोष्टींचा विचार करता एवढ्या उशिरापर्यंत परीक्षा ठेवणे योग्य नाही. म्हणून, १ ली ते ९ वी पर्यंतच्या वार्षिक परीक्षा १५ एप्रिलपूर्वी घेण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.

या प्रसंगी शिक्षक परिषदेचे पदाधिकारी नितीन ठाकूर (अध्यक्ष, धुळे महानगर), प्रकाश पाटील (कार्यवाह, धुळे महानगर), हेमंतकुमार विसपुते (अध्यक्ष, धुळे जिल्हा ग्रामीण), प्रसाद पाटील (कार्यवाह, धुळे जिल्हा ग्रामीण), प्रमोद दीक्षित, जयेश कोर (संघटन मंत्री), अभिजीत जोशी (कोषाध्यक्ष), रेखा थोरात (उपाध्यक्ष), सीमा डोंगरे (महिला आघाडी प्रमुख), मनोज सूर्यवंशी (प्रसिद्धी प्रमुख), नाना हलोर, मनोज चौधरी, जगदीश जोशी, प्रशांत नेरकर (कार्याध्यक्ष), अशोक गिरी, आनंद देवरे, मदनलाल मिश्रा (ज्येष्ठ मार्गदर्शक), भरतसिंह भदोरिया (राज्य कार्यकारिणी सदस्य) आणि सुनील मोरे (नाशिक विभाग कोषाध्यक्ष) उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम