
पेट्रोल पंप दरोडाप्रकरणी पाच सराईत गुन्हेगार जेरबंद !
आरोपींकडून रोकडसह शस्त्र जप्त ; एलसीबीची कारवाई
पेट्रोल पंप दरोडाप्रकरणी पाच सराईत गुन्हेगार जेरबंद !
आरोपींकडून रोकडसह शस्त्र जप्त ; एलसीबीची कारवाई
मुक्ताईनगर | प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर झालेल्या सशस्त्र दरोड्याचा अखेर जळगाव गुन्हे शाखेने चार दिवसांच्या अतिशय काटेकोर तपासानंतर पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात भुसावळ आणि अकोला तालुक्यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन साथीदाराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मुक्ताईनगर येथील रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला होता. त्यानंतर या दरोडेखोरांनी सलग कर्की फाटा (ता. मुक्ताईनगर) येथील मनुभाई आशीर्वाद पेट्रोल पंप आणि वरणगाव शिवारातील सैय्यद पेट्रोल पंप यांनाही लुटले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडून डीव्हीआर चोरला आणि तब्बल एक लाख ३३ हजार रुपयांची रोकड घेऊन फरार झाले.
अटक झालेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: सचिन अरविंद भालेराव (३५, भुसावळ, मूळ रा. खकनार, जि. बुर्हाणपूर, म.प्र.), पंकज मोहन गायकवाड (२३, वेडीमाता मंदिर, जुना सातारा रोड, भुसावळ), हर्षल अनिल बावस्कर (२१, बाळापूर, जि. अकोला), देवेंद्र अनिल बावस्कर (२३, बाळापूर, जि. अकोला) आणि प्रदुम्न दिनेश विरघट (१९, श्रद्धा नगर, कौलखेड, अकोला).
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ४० हजार रुपयांची रोकड, तीन गावठी पिस्तुले, पाच मॅगझिन, नऊ मोबाईल फोन आणि एक निळ्या रंगाची सॅक बॅग जप्त केली आहे.
जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि भुसावळचे उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, शेखर डोमाळे, जितेंद्र वल्टे व ग्रेडेड पीएसआय रवी नरवाडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. पोलिसांनी चार आरोपींना नाशिकहून तर एक आरोपी व त्याचा अल्पवयीन साथीदार अकोल्यातून अटक केला. मुख्य आरोपीवर आधीच गुन्हे नोंद: अटकेतील मुख्य आरोपी सचिन भालेराव याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि दंगा करणे या दोन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम