पैशांच्या मागणीला कंटाळून तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या; पत्नी व सासरच्या तिघांविरोधात गुन्हा

बातमी शेअर करा...

पैशांच्या मागणीला कंटाळून तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या; पत्नी व सासरच्या तिघांविरोधात गुन्हा

धरणगाव, पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून पैशांची मागणी, घटस्फोटाची धमकी आणि सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याने दोनगाव येथील एका २८ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेखाली जीव देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पत्नीसह सासरच्या तिघांविरोधात धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत अरुण पाटील (वय २८, रा. दोनगाव, ता. धरणगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो काही दिवसांपासून कौटुंबिक वादामुळे मानसिक तणावात होता. त्याची पत्नी गायत्री हेमंत पाटील ही माहेरी मंगरूळ (ता. अमळनेर) येथे राहत होती. दरम्यान, तिच्यासह सासरे बाळू भीमराव बोरसे आणि सासू रेखाबाई बाळू बोरसे यांनी वेळोवेळी हेमंतवर घटस्फोट घे किंवा १५ लाख रुपये दे, असा दबाव टाकून मानसिक छळ केला.

या सततच्या त्रासाला कंटाळून हेमंत पाटील २२ जुलै रोजी घरातून निघून गेला होता. त्यानंतर त्याने पाळधी येथे धावत्या रेल्वेखाली झेप घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला मृतदेह अनोळखी होता, मात्र पोलीस तपासातून हेमंत पाटील याची ओळख पटली.

मयताचे वडील अरुण विश्राम पाटील यांनी याबाबत धरणगाव पोलिसांत तक्रार दिली असून, पत्नी गायत्री पाटील, सासरे बाळू बोरसे आणि सासू रेखाबाई बोरसे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खंडारे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम