
पोक्सो कायदा : मुलांसाठी अभय, गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ
पोक्सो कायदा : मुलांसाठी अभय, गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ
नूतन विद्यालयात कायद्याचा हसत-खेळत संवाद; ‘स्क्रीन टच’च्या धोक्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बोदवड प्रतिनिधी : तालुक्यातील हरणखेड येथील नूतन विद्यालयात ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी पोक्सो (POCSO) कायद्याबाबत मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “पोक्सो कायदा हा मुलांसाठी सुरक्षा कवच असून, गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ आहे,” असे परखड प्रतिपादन बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन टी. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. आर. सोनवणे सर होते. ॲड. अर्जुन पाटील यांनी पोक्सो कायद्याची पार्श्वभूमी, उद्देश, कठोर शिक्षेच्या तरतुदी तसेच ‘गुड टच-बॅड टच’ आणि सोशल मीडियातील ‘स्क्रीन टच’ या गंभीर विषयांवर सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी निर्भयपणे आपले हक्क ओळखावेत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी वकील संघाचे सचिव ॲड. किशोर महाजन यांनी कायद्यातील खबरदारीच्या बाबी सांगितल्या, तर ॲड. धनराज प्रजापती यांनी बालकांचे न्याय हक्क व कायदेशीर संरक्षण याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना वकिलांनी समर्पक उत्तरे देत संवादात्मक वातावरण निर्माण केले.
सूत्रसंचालन नितीन बराकले सर यांनी केले, तर आभार विजय पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम