
पोदार इंटरनॅशनल स्कूल व पोदार प्रेप येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन ‘नया भारत-महोत्सव’ उत्साहात साजरा
पोदार इंटरनॅशनल स्कूल व पोदार प्रेप येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन ‘नया भारत-महोत्सव’ उत्साहात साजरा
जळगाव, दि. १५ ऑगस्ट – जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल व पोदार प्रेपमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन ‘नया भारत-महोत्सव’ या थीमसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिनाचे औचित्य साधून देशप्रेम, संस्कृती, शौर्यगाथा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम रंगले.
प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त लान्स नायक मा. श्री. शरद मधुकर गाठे (भारतीय सेना) उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उपस्थितांनी मानवंदना दिली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७:३५ वाजता राष्ट्रगीताने झाली. शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख मयूर महाजन यांच्या नेतृत्वाखाली ध्वजगीत आणि ‘महाराष्ट्र गीत’ सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बहारदार स्वागत नृत्य, थोर स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषेतील देशभक्तीपर घोषणा, लघुनाटिका, समूहगीत आणि देशभक्तीपर कविता सादर करून वातावरण भारावून टाकले.
कु. अर्हा श्रीवास्तव हिने भारत मातेच्या वेशभूषेत स्वगत सादर करत भारतीय नागरिकांकडून असलेल्या अपेक्षा प्रभावीपणे मांडल्या. क्षितीज पाटील याने स्वातंत्र्यवीरांची शौर्यगाथा तर माधव पाटील याने भारतीय संस्कृती व परंपरांचे महत्त्व आपल्या भाषणातून उलगडले. ‘आधुनिक भारत आणि देशभक्ती’ या विषयावरील पथनाट्याला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली. इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय खाद्य संस्कृतीवर आधारित आकर्षक देखावा सादर केला.
शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या वेळी शिक्षक-पालक संघाचे प्रतिनिधी व पालक उपस्थित होते.
मुख्याध्यापक गोकुळ महाजन यांनी सर्वांचे स्वागत करत विद्यार्थ्यांना “भारत का अमृतकाळ महोत्सव-नया भारत” या संकल्पनेची प्रेरणा दिली. भारतीय कायदा, न्यायव्यवस्था, बंधुभाव व सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रमुख अतिथी शरद गाठे यांनी विद्यार्थ्यांच्या देशप्रेम व सहकार्यभावनेचे कौतुक करत जबाबदार नागरिक म्हणून सजग राहण्याचा संदेश दिला.
याप्रसंगी शाळेचे उपप्राचार्य दिपक भावसार,पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका उमा वाघ ,शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कु. अर्पिता भावसार हिने आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम