
पोदार शाळेत गांधी जयंती अभिवादन व विजयादशमी उत्सव – संस्कार व उत्साहाचा संगम !
पोदार शाळेत गांधी जयंती अभिवादन व विजयादशमी उत्सव – संस्कार व उत्साहाचा संगम !
जळगाव : पोदार इंटरनॅशनल स्कूल, जळगाव येथे गांधी जयंती व विजयादशमीचा दुहेरी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्कार, परंपरा आणि देशभक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य श्री. गोकुळ महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सुरेल भजनांनी वातावरण भारून गेले. इयत्ता तिसरीतील निहारिकाने स्फूर्तिदायी कविता सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली, तर कु. शर्वरी चौबे हिने आपल्या प्रभावी भाषणातून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
विद्यार्थ्यांनी “रघुपती राघव राजाराम” या गीतावर दिलखेचक नृत्य सादर केले, तर राम-रावण संघर्षाचे प्रतीक असलेली रावणवध नाटिका सादर करून दशरामागील सांस्कृतिक व नैतिक संदेश अधोरेखित केला.
प्राचार्य श्री. गोकुळ महाजन यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा देताना आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गांधीजींच्या विचारांचे जीवनात आचरण करण्याचे महत्त्व सांगितले. दया, करूणा आणि सत्यनिष्ठा या गुणांचे महात्म्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला उपप्राचार्य श्री. दीपक भावसार, मुख्याध्यापिका सौ. उमा वाघ, समन्वयक, शिक्षकवर्ग, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी कुशलतेने सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने या अविस्मरणीय सोहळ्याची सांगता झाली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम