पोलीस निरीक्षक संदीप पाटील अखेर निलंबित; आयजी कराळे यांचे आदेश

बातमी शेअर करा...

पोलीस निरीक्षक संदीप पाटील अखेर निलंबित; आयजी कराळे यांचे आदेश

 

जळगाव: स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका विधवा महिलेवर अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपांनंतर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता आरोप

गेल्या आठवड्यात, २९ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी संदीप पाटील यांच्यावर सनसनाटी आरोप केले होते. पाटील यांनी एका गुन्ह्यात मदत करण्याच्या बहाण्याने महिलेशी मैत्री केली, त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून जळगाव, धुळे आणि नाशिक येथे तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला होता. तसेच, महिलेने तक्रार करण्याची धमकी दिल्यावर, “मी एसपी, आयजी, डीजी यांना घाबरत नाही आणि पालकमंत्री माझ्या खिशात आहे,” अशी धमकी संदीप पाटील यांनी दिल्याचा कॉल रेकॉर्डिंगही चव्हाण यांनी बैठकीत ऐकवला होता.

अहवालानंतर तात्काळ कारवाई

या आरोपानंतर जिल्हाभरात खळबळ उडाली होती. पीडित महिलेने गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले असले तरी, नंतर ती माघारी परतल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नाही. मात्र, या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नैतिकतेला सोडून केलेल्या या कृत्याचा अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांना पाठवला होता. त्यानंतर काही तासांतच संदीप पाटील यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी राहुल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती.

आता आयजी कराळे यांनी निलंबनाचे आदेश दिले असून, या प्रकरणाची प्राथमिक खातेअंतर्गत चौकशी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यामार्फत केली जाईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम