
पोळा सण साजरा केल्यानंतर तरुणाची आत्महत्या
जळगाव: पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केल्यानंतर जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऋषिकेश विजय न्हावी असे या तरुणाचे नाव असून, त्याने शुक्रवारी रात्री राहत्या घरात हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
ऋषिकेश न्हावी हा आपल्या कुटुंबासोबत ममुराबाद येथे राहत होता. शुक्रवारी दिवसभर त्याने आपल्या गावात बैलांना (सर्जा-राजा) सजवून पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. रात्रीच्या वेळी, तो अचानक रागात आपल्या घराच्या गच्चीवर गेला. कुटुंबीय त्याच्या मागोमाग गेले असता, त्यांनी ऋषिकेशला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले.
कुटुंबीयांनी तात्काळ त्याला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
ऋषिकेशने नेमक्या कोणत्या कारणावरून आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार प्रकाश चिंचोरे पुढील तपास करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम