प्रतापराव जाधवांच्या सगळ्या भानगडी आणि भ्रष्टाचार बाहेर काढणार- रविकांत तुपकर

डॉ टालेंच्या तडीपारीवरून तुपकर आक्रमक..!

बातमी शेअर करा...

प्रतापराव जाधवांच्या सगळ्या भानगडी आणि भ्रष्टाचार बाहेर काढणार- रविकांत तुपकर

डॉ टालेंच्या तडीपारीवरून तुपकर आक्रमक..!

 

बुलढाणा प्रतिनिधी

मीच कायदा अन् माझाच न्याय म्हणणार्‍या केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या खुनशी राजकारणामुळे गरीब कुटुंबातील तरूणांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधात काम केले, रविकांत तुपकर यांची प्रचार यंत्रणा ताकदीने सांभाळली, मेहकर विधानसभा क्षेत्रात तुपकारांना तोडीस तोड मतदान मिळवून दिले म्हणून शेतकरी चळवळीतील ज्ञानेश्‍वर टाले यांना सात जिल्ह्यातून तडीपार केले. एवढ्या खालच्या पातळीच्या राजकारणाची लाज वाटते, अशी तुफान फटकेबाजी करत खुनशी राजकारण करणार्‍या प्रतापराव जाधव यांची दादागीरी व सुडाचे राजकारण खपवून घेणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.

तसेच प्रतापरावांच्या सगळ्या भानगडी-भ्रष्टाचार बाहेर काढून पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या निवासासमोर उपोषण करून मंत्रिमंडळातून प्रतापरावांना काढण्याची मागणी करू.

बुलढाणा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना रविकांत तुपकर म्हणाले, गरीब शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले डॉ. ज्ञानेश्‍वर टाले गेल्या तेरा वर्षापासून शेतकरी चळवळीत ताकदीने काम करत आहेत. शेतकर्‍यांना पिकविमा मिळावा, सोयाबीन व कापसाला भाववाढ मिळावी यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. या आंदोलन, मोर्चा दरम्यान त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले. खरेतर चळवळीतील कार्यकर्त्यांवर आंदोलनाचे गुन्हे दाखल असणे हा फार मोठा अपराध नाही. कारण सर्वच पक्षातील नेते अन् कार्यकर्त्यांवर असे गुन्हे दाखल असतात. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यावरही असे गुन्हे दाखल होते. परंतू व्हाईट कॉलर भु माफीया, वाळू माफीयांना पोसणार्‍या जाधव यांनी डॉ. ज्ञानेश्‍वर टाले यांच्यावर दाऊदच्या टोळीचा हस्तक असल्याप्रमाणे थेट तडीपारीची कारवाई घडवून आणली. मुळात प्रतापराव जाधव यांचे राजकारणच खुनशी अन् दादागीरीचे आहे. मी म्हणेल तेव्हा माझ्या पक्षात या, निवडणुकीत माझे काम करा अन्यथा खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये पाठवील हे त्यांचे धोरण आहे. लोकसभा निवडणुकीत कुठलाही पक्ष अथवा मोठ्या नेत्याची साथ नसताना सर्वसामान्य जनता व ज्ञानेश्‍वर टाले यांच्या सारख्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर मी अडीच लाख मते घेतली. डॉ. टाले यांनी मेहकर विधानसभा क्षेत्रात माझ्या प्रचाराची संपुर्ण जबाबदारी सांभाळत बलाढ्य अन् प्रस्थापीत असलेल्या विद्यमान खासदारांच्या तोडीस तोड मते मला मिळवून दिली. आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत डॉ. ज्ञानेश्‍वर टाले यांच्या सारखे शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते वरचढ ठरू शकतात, ही भीती त्यांना आता वाटत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांना हाताशी धरून डॉ. ज्ञानेश्‍वर टाले यांच्यावर तडीपारीची कारवाई घडवून आणली. खरेतर केंद्रीय मंत्री असलेल्या प्रतापराव जाधवांनी मॅच्युटीरीचे राजकारण करायला हवे. मंत्रीपदाचा उपयोग शेतकरी, कामगार व जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न सोडवण्यासाठी करायला हवा. परंतु प्रतापराव जाधव हे खुनशी राजकारण करत आहेत. अनामीक भितीतून गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या कार्यकर्त्यांचे जीवन उध्वस्त करत आहेत. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर मी एखादे सेक्रेटरी अथवा मंत्र्यांना भेटलो तर ते त्याच आठवड्यात त्यांची भेट घेतात अन् रविकांत तुपकर यांना एवढा भाव का देता असे सांगतात. माझ्या बातम्या प्रसिध्द केल्या म्हणून पत्रकारांना दोष देतात. अरे मी काय बाईटपुरता कार्यकर्ता आहे का? एकविस वर्षे शेतकरी चळवळीला दिली आहेत, असे रविकांत तुपकर म्हणाले.

 

मंत्रीपद जन्मभर पुरणार नाही, प्रतापराव जरा भान ठेवा…!

आम्हाला जेलमध्ये टाका, फासावर लटकवा आम्ही खरेच बोलणार, थांबणार नाही. खा. प्रतापरावांच्या दबावाखाली बुलढाणा जिल्ह्यातील अधिकारी इंग्रजांपेक्षा भयंकर कारभार करत आहेत. खरेतर त्यांच्या दबावाखाली मेहकरचे पोलिस अधिकारी, येथील एसडीओ यांनी राजीनामे दिले पाहीजेत अन् प्रतापराव जाधव यांच्याकडे जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे सिईओ यांचा चार्ज दिला पाहीजे. कारण प्रत्येक अधिकार्‍याला घरी बोलवतात, दादागीरी करतात, त्यांच्यावर दबाव टाकतात. इंग्रजांच्याही काळात एवढी एकाधिकारशाही नव्हती. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी एवढी मोठी जबाबदारी चांगले काम करण्यासाठी दिली आहे. त्याचा उपयोग लोकांची कामे करण्यासाठी करावा. खामगाव- जालना रेल्वे मार्गाच्या प्रश्‍नावर चार निवडणुका लढवल्या. आतातरी हा मार्ग पुर्ण करावा. परंतू खासदार ज्या गावात त्यांना कमी अन् रविकांत तुपकरांना जास्त मते मिळाली त्या गावातील लोकांची कामे करत नाहीत. एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण आजपर्यंत बुलढाणा जिल्ह्यात कोणीच केले नव्हते. जनता असल्या दडपशाहीच्या राजकारणाला भीक घालणार नाही. लोकांनी यांना यजमान जावू नये. जिथे कुठे अडचण येईल तिथे मी सोबत आहे. कामे करण्यासाठी आमदार- खासदारच असावे, असे काही नाही. सत्तेत कुणीही असले तरी लोकांची कामे करण्याची धमक माझ्यात आहे. चळवळीच्या बळावर रोज आम्ही लोकांची कामे करतो, असे सांगत प्रतापराव यांचे मंत्रीपद दीड- दोन वर्षापेक्षा जास्त काळचे नाही, पद आयुष्यभर पुरणार नाही याचे भान त्यांनी ठेवावे असे रविकांत तुपकर म्हणाले.

माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी, माझ्या घरावर कॅमेरे लावलेत…!

माझ्या घराच्या गेटसमोर अनधिकृतरित्या बँक टाकली. खरेतर रहीवाशी भागात कमर्शीअल बँक टाकताच येत नाही तरी त्यांनी टाकली. त्या बँकेत काळे कुत्रे फिरकत नाही. परंतू रविकांत तुपकारांच्या घरी कोण येतं? मी आणि माझ्या कुटुंबाची सिसिटीव्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातून रेकी करण्यासाठी बँक टाकली. एखादा कार्यकर्ता भेटायला घरी आला तर लगेच त्याला खासदारांचा फोन येतो. पाच वर्षापासून मी व माझे कुटुंब हे सारे सहन करत आहोत. बरं एवढे दिवस रेकी करून काय मिळवले. एवढं निच राजकारण बुलढाणा जिल्हा आणि महाराष्ट्रात यापुर्वी कोणीही केलेले नाही. याची आम्ही तक्रार करणार आहोत. ती बँक हटवण्याची मागणी करणार आहोत, असे रविकांत तुपकर म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम