भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे प्रभाग १२ ‘ब’ मधून बिनविरोध

बातमी शेअर करा...

भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे प्रभाग १२ ‘ब’ मधून बिनविरोध

जळगाव प्रतिनिधी महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरात दाखल झालेल्या १ हजार ३८ उमेदवारी अर्जांची बुधवारी छाननी पार पडली. या छाननीत प्रभाग क्रमांक १२ ‘ब’ (ओबीसी महिला) या राखीव जागेवर भाजपाच्या उज्ज्वला बेंडाळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून, मतदान होण्याआधीच भाजपाचे विजयी खाते खुले झाले आहे.

प्रभाग १२ ‘ब’ मधून एकूण तीन महिला उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. यामध्ये भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे, वैशाली पाटील आणि भारती चोपडे यांचा समावेश होता. मात्र छाननी प्रक्रियेत प्रतिस्पर्धी दोन्ही उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरले.

भारती चोपडे यांनी उमेदवारी अर्ज भरताना आवश्यक माहितीमध्ये त्रुटी ठेवल्याने त्यांचा अर्ज छाननीत बाद करण्यात आला. तर वैशाली पाटील यांनी एकाच वेळी प्रभाग १२ मधील ‘ब’सह इतर दोन प्रभागांतून अर्ज दाखल केले होते. निवडणूक नियमांनुसार एका उमेदवाराला केवळ एका प्रभागातूनच निवडणूक लढवता येते. त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम दाखल केलेला अर्ज वैध धरत उर्वरित अर्ज तांत्रिकदृष्ट्या अवैध ठरविण्यात आले.

या प्रक्रियेनंतर प्रभाग क्रमांक १२ ‘ब’ मध्ये केवळ भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांचाच एकमेव अर्ज शिल्लक राहिला. परिणामी निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र कुवर यांनी बेंडाळे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदान होण्याआधीच भाजपाने बिनविरोध विजयाची नोंद केल्याने पक्षाच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, उज्ज्वला बेंडाळे यांच्या निवडीने प्रभाग १२ ‘ब’ मध्ये भाजपाचा झेंडा फडकला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम