प्रवाशांच्या सतर्कतेमुळे नकली टीसी  रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात

बातमी शेअर करा...

प्रवाशांच्या सतर्कतेमुळे नकली टीसी  रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात

रेल्वे पोलिसांची तत्काळ कारवाई

 

भुसावळ | गोरखपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या मुंबई एलटीटी (११०८०) एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या सतर्कतेमुळे एक बनावट तिकीट तपासनीस पकडला गेला. भुसावळ रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रफुल गजबीये या व्यक्तीला अटक केली असून, त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सतर्क प्रवाशांमुळे बनावट टीसीचा पर्दाफाश

दि. २३ मार्च रोजी, गाडीतील नियमित तिकीट तपासणी दरम्यान, एस-८ कोचमध्ये एक अनोळखी व्यक्ती प्रवाशांची तिकीट तपासत असल्याचे निदर्शनास आले. प्रवाशांनी त्याला अधिकृत ओळखपत्र विचारले असता, त्याच्याकडे कोणतेही रेल्वेचे अधिकृत कागदपत्र नव्हते.

खंडवा ते नेपानगर दरम्यान काही प्रवाशांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी तात्काळ रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर, भोपाळ विभागाचे डीवाय एसटीआय मनोज कुमार यांनी तत्काळ रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलिसांना कळवले.

रेल्वे पोलिसांची तत्काळ कारवाई

रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) सहाय्यक निरीक्षक एन. के. सिंग आणि कॉन्स्टेबल नितेश कुशवाह तसेच भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल संजय जोशी यांनी भुसावळ स्थानकावर गाडी पोहोचताच प्रफुल गजबीये याला ताब्यात घेतले.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

सध्या भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात आरोपीची चौकशी सुरू असून, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही संशयास्पद व्यक्तीची माहिती तात्काळ रेल्वे पोलिसांना कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

– प्रतिनिधी

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम