प्रशासकीय कार्यालयांमध्ये प्रवेशबंदीची अजब शिक्षा! 

फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पिंटू राणेंना दोन महिन्यांची बंदी

बातमी शेअर करा...

प्रशासकीय कार्यालयांमध्ये प्रवेशबंदीची अजब शिक्षा! 

फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पिंटू राणेंना दोन महिन्यांची बंदी

जळगाव – फैजपूरचे माजी नगराध्यक्ष नीलेश उर्फ पिंटू राणे यांना शासकीय अधिकाऱ्यांशी वाद घालून अरेरावीची भाषा वापरल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय मुख्यालये तसेच यावल आणि रावेर तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये दोन महिन्यांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रभारी अपर जिल्हाधिकारी जयश्री माळी यांनी हे आदेश काढले असून, या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

१६ जुलै रोजी राणे यांनी फैजपूरचे प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या दालनात घुसून अरेरावीची भाषा वापरत असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे. दरवाजा बंद असेल तर लाथ मारून तोडण्याची धमकीही त्यांनी दिल्याचे सांगण्यात येते. त्याआधी, १५ जुलै रोजी त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यांच्या दालनाचे छायाचित्रण करण्याचा प्रयत्न केल्याची नोंद आहे. या प्रकारांमुळे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता.

या पार्श्वभूमीवर, कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन राणेंवर १९ जुलै ते १६ सप्टेंबरदरम्यान सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, या काळात त्यांनी तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची व सुनावणीसाठी दूरदृश्य प्रणालीचा वापर करण्याची मुभा देण्यात आली आहे. निवडणुकीसंदर्भात उभे राहत असल्यास त्यांना तासाभराची परवानगीही दिली जाईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, “मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी असून, जनतेच्या प्रश्नांसाठी शासकीय कार्यालयात जावे लागते. मधुकर साखर कारखान्याबाबत मी लढा देत असून, यावल तहसीलदारांच्या निलंबनासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यामुळेच मला लक्ष्य करण्यात येत आहे. हा निर्णय माझ्या घटनात्मक अधिकारांच्या विरोधात असून, माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

प्रशासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पुढील दोन महिने राणेंना शासकीय कार्यालयांपासून दूर राहावे लागणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम