
प्रसिद्ध बॉक्सिंग प्रशिक्षक स्टीफन डेव्ह यांचे नीलगायच्या धडकेत निधन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
प्रसिद्ध बॉक्सिंग प्रशिक्षक स्टीफन डेव्ह यांचे नीलगायच्या धडकेत निधन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
भुसावळ : शहरातील कंडारी गावातील नागसेन कॉलनीचे रहिवासी व प्रसिद्ध बॉक्सिंग प्रशिक्षक स्टीफन डेव्ह (वय अंदाजे ५५) यांचे शनिवारी (ता. १७ मे) पहाटे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. पानाच्या कुऱ्हे गावाजवळ नीलगायच्या धडकेत हा अपघात घडला. या घटनेत त्यांचे जावई गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, स्टीफन डेव्ह आणि त्यांचे जावई अहिरे बुलेट मोटारसायकल (MH-12-SH-1716) वरून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना, पानाच्या कुऱ्हे गावाजवळ अचानक नीलगायांचा कळप रस्त्यावर आल्याने त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात डेव्ह यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना भुसावळ येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
जखमी जावयाला पुढील उपचारासाठी जळगावच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. डेव्ह यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
स्टीफन डेव्ह हे रेल्वे सेवेत कार्यरत होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत शेकडो तरुणांना बॉक्सिंग प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रशिक्षक म्हणून त्यांचा भुसावळ व परिसरात मोठा दरारा होता.
त्यांच्या अचानक निधनाने भुसावळमधील क्रीडा व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून, शिष्य, मित्रपरिवार व क्रीडाप्रेमी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
या घटनेनंतर रस्त्यावरील वन्यजीवांच्या धोक्यांविषयी जनतेत तीव्र संताप असून, अनेकांनी शासनाकडे प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम