
प्रामाणिकपणाचा आदर्श! हरवलेला मोबाईल परत करत होमगार्डने जिंकली लोकांची मने
अमळनेर: ‘सत्यमेव जयते’ या ओळीला खऱ्या अर्थाने सिद्ध करत अमळनेर पथकातील होमगार्ड गणेश लांडगे यांनी प्रामाणिकतेचा एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. गणेशोत्सवाच्या विसर्जन ड्युटीवर असताना त्यांना सापडलेला मोबाईल त्यांनी कोणत्याही मोहाविना, प्रामाणिकपणे मूळ मालकाकडे परत केला.
मंगरूळ येथील गणेश विसर्जनावेळी गणेश लांडगे ड्युटीवर असताना त्यांना एक मोबाईल सापडला. कोणताही स्वार्थ न बाळगता त्यांनी तात्काळ त्या मोबाईलच्या मालकाचा शोध सुरू केला. तपासणीनंतर तो मोबाईल पातोंडा नांद्री येथील एका गरीब कुटुंबातील मुलगा रावशा देविदास भिल याचा असल्याचे समोर आले.
जेव्हा रावशाला मोबाईल परत मिळाला, तेव्हा तो खूप भावूक झाला. त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. “हा मोबाईल हरवल्यापासून मी दोन दिवस जेवलोही नाही. शेतात काम करून जमा केलेल्या पैशांतून मी तो विकत घेतला होता. आज मोबाईल परत मिळाल्याने माझी दुनिया पुन्हा उजळली आहे,” असे त्याने सांगितले.
गणेश लांडगे यांच्या या सचोटीच्या कामामुळे अमळनेर पोलीस, होमगार्ड संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर वाढला असून, त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम