
प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याचा गोळीबार
मुलगी ठार, जावई जखमी , चोपडूयातील घटनेने खळबळ
प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याचा गोळीबार
मुलगी ठार, जावई जखमी , चोपडूयातील घटनेने खळबळ
चोपडा | प्रतिनिधी
शहरातील आंबेडकर नगर (खाई वाडा) परिसरात शनिवारी रात्री उशिरा प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याने आपल्या मुलीवर आणि जावयावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत मुलगी तृप्ती अविनाश वाघ (२४) हिचा जागीच मृत्यू झाला असून, जावई अविनाश ईश्वर वाघ (२८) गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण चोपडा शहरात भीती आणि खळबळ उडाली आहे.
दोन वर्षांपूर्वी तृप्ती आणि अविनाश यांनी प्रेमविवाह केला होता. मात्र वडील किरण अर्जुन मंगले (४८, रा. शिरपूर, जि. धुळे) यांना हा विवाह मान्य नव्हता. मनात सल बाळगत त्यांनी चोपडा येथे आयोजित अविनाशच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमात गोळीबार केला.
वऱ्हाड्यांच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अचानक झालेल्या गोळीबाराने एकच खळबळ उडाली. किरण मंगले यांनी प्रथम आपल्या मुलीवर गोळी झाडली, ज्यात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जावई अविनाशवर गोळी झाडून त्याला गंभीर जखमी केले.
गोळीबारानंतर उपस्थित वऱ्हाड्यांनी संतप्त होऊन आरोपी वडिलांना बेदम मारहाण केली. यामध्ये किरण मंगले गंभीर जखमी झाले. जखमी किरण मंगले आणि अविनाश वाघ यांना तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालय परिसरात नातेवाईक व वऱ्हाड्यांची मोठी गर्दी उसळली होती.
या घटनेमुळे चोपडा शहरात भीतीचे आणि तणावपूर्ण वातावरण पसरले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम