प्रेमविवाह केल्याच्या रागातून मामाचा भाचीवर प्राणघातक हल्ला

महिला दिनाच्या दिवशी झालेल्या घटनेने खळबळ; पिंप्री येथे धक्कादायक प्रकार

बातमी शेअर करा...

प्रेमविवाह केल्याच्या रागातून मामाचा भाचीवर प्राणघातक हल्ला

महिला दिनाच्या दिवशी झालेल्या घटनेने खळबळ; पिंप्री येथे धक्कादायक प्रकार

यावल (प्रतिनिधी): प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका क्रूर मामाने स्वतःच्या भाचीवर विळ्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणीच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. तसेच, तिला वाचवण्यासाठी आलेली तिची नणंद देखील जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी यावल तालुक्यातील पिंप्री येथे घडली. विशेष म्हणजे हा प्रकार जागतिक महिला दिनाच्या दिवशी घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्रेमविवाहाचा राग रक्तपातात

यावल तालुक्यातील पाडळसे गावातील तरुण चेतन वासूदेव कोळी याने उल्हासनगर येथील तरुणी वैष्णवी विनोद तायडे हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर ते पिंप्री येथे आपल्या नंदोईच्या घरी राहण्यासाठी गेले होते. हा विवाह तिच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. त्याच दरम्यान, ही माहिती तिचा मामा उमाकांत चिंधू कोळी (रा. पाडळसे) याला समजली. संतापलेल्या उमाकांत कोळीने शनिवारी सकाळी पिंप्री येथे जाऊन भाचीवर थेट हल्ला चढवला.

विळ्याने केले भाचीवर वार

उमाकांत कोळीने वैष्णवीवर केळी कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार विळ्याने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात वैष्णवीच्या गळ्यावर गंभीर इजा झाली. तिला वाचवण्यासाठी तिची नणंद वैशाली सपकाळे धावून आली असता, आरोपीने तिच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात वैशालीच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

मामाच होता पालक, तरीही केला जीवघेणा हल्ला

वैष्णवीचे बालपण तिच्या मामाकडेच गेले होते. त्याने तिला लहानपणापासून वाढवले होते. मात्र, तिने प्रेमविवाह केल्याचा राग त्याच्या मनात होता. त्यातूनच त्याने हा संतापजनक प्रकार केल्याची चर्चा गावभर सुरू आहे.

ग्रामस्थांनी दिला मदतीचा हात

हल्ल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेतली आणि दोघींना उमाकांत कोळीच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैष्णवीच्या प्रकृतीची गंभीर स्थिती पाहता तिला पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

गुन्हा दाखल;

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी उमाकांत कोळीविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. सध्या तो फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

महिला दिनीच महिलांवर हल्ला!

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समाजात महिलांच्या सन्मानाबाबत अनेक कार्यक्रम होत असताना, दुसरीकडे एका तरुणीवर तिच्या मामानेच केलेला प्राणघातक हल्ला समाजातील मानसिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतो. या घटनेनंतर गावात संतापाचे वातावरण असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम