प्रेयसीचा विहिरीत ढकलून खून करणाऱ्या प्रियकराला जन्मठेप !

भुसावळ सत्र न्यायालयाचा निकाल

बातमी शेअर करा...

प्रेयसीचा विहिरीत ढकलून खून करणाऱ्या प्रियकराला जन्मठेप !

भुसावळ सत्र न्यायालयाचा निकाल

जळगाव प्रतिनिधी :, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा लग्नाचा तगादा लागल्याने संतापलेल्या प्रियकराने तिला मुक्ताईनगर तालुक्यातील भाये शिवारातील नायगाव रोडवर असलेल्या एका खोल विहीरीत ढकलून खून केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी गुलाम इद्रीस गुलाम हुसेन (रा. मोमीनपुरा, वार्ड क्र. ३०, श्रीकुमार बिल्डिंग जवळ, बुरहानपूर, मध्यप्रदेश) याला भुसावळ सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, २७ मार्च २०२२ रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास नायगाव रोडवरील रविंद्र भारकर पोहेकर यांच्या गट क्र. २३०/१ मधील शेतातील विहीरीवर आरोपी गुलाम इद्रीस व मयत महिला सकाळपासून दुपारपर्यंत बसून होते. दोघांमध्ये मागील दोन वर्षांपासून अनैतिक संबंध होते व ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, मयत महिलेकडून वारंवार लग्नाचा आग्रह करण्यात येत असल्याने आरोपी संतप्त झाला होता. याच संतापातून त्याने महिलेचा खून करण्याचा कट रचला.

त्याच दिवशी आरोपीने महिलेचा हात धरून तिला विहीरीत ढकलले. विहीरीतील इलेक्ट्रिक मोटारीच्या पाईप व वायरचा वापर करून तिला बाहेर येऊ न देता, तो वायर आणि पाईप विळ्याच्या सहाय्याने कापून टाकला. त्यामुळे महिला पाण्यात बुडून मरण पावली. या घटनेची माहिती मिळताच मयत महिलेचा भाऊ शे. फरीद शे. मुसा (रा. बडनेर भोलजी, ता. नांदुरा, जि. बुलढाणा) यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रदीप शेवाळे व उपनिरीक्षक राहुल बोरकर यांनी केला. तपासादरम्यान १७ साक्षीदार तपासण्यात आले, ज्यात मयताची बहिण हसीनाबो शेख, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सुरज मराठे, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली पाटील यांचा समावेश होता. तसेच आरोपी आणि मयत महिलेचे मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), टॉवर लोकेशन आणि सिमकार्ड माहिती हे पुरावे निर्णायक ठरले.

या सर्व पुराव्यांच्या आधारे सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता मोहन देशपांडे यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत आरोपी गुलाम इद्रीस गुलाम हुसेन यास आयुष्यभराच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात पैरवी अधिकारी पोलिस शिपाई कांतीला कोळी व ज्ञानेश्वर चौधरीयांची भूमिका महत्वाची ठरली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम