
फुलगाव शिवारात अवैध शस्त्रासह एक जण अटकेत
फुलगाव शिवारात अवैध शस्त्रासह एक जण अटकेत
वरणगाव ता. भुसावळ : फुलगाव शिवारातील महामार्ग क्रमांक ५३ वरील सर्व्हिस रोडवर दोन व्यक्ती अवैध शस्त्र घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एकाला अटक केली असून दुसरा व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाकडून सुमारे ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि.३० सप्टेंबर रोजी सायंकाळी सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, पो. उपनिरीक्षक मंगेश बेडकोळी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक फुलगाव शिवारात रवाना करण्यात आले. यामध्ये पोलीस कर्मचारी यासिन पिंजारी, अजय निकम, गणेश राठोड, प्रशांत ठाकुर, गोपीचंद सोनवणे, ईश्वर तायडे, फिरोज पठाण, मनोज म्हस्के यांचा समावेश होता. पोलिस पथकाने रात्री ९.३० वाजता छापा टाकला असता, संशयित इसम मोटारसायकल (एमएच १९डीटी ८८०२) वर बसलेला आणि दुसरा बाजूला उभा होता. पोलीस कारवाईची चाहूल लागताच उभा असलेला इसम झाडाझुडपाचा फायदा घेत पसार झाला. मोटारसायकलवर बसलेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.अटक केलेल्या व्यक्तीचे नाव काविन बाबु भोसले (वय २५, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे असून, त्याने फरार साथीदाराचे नाव सुजान चेट्टान भोसले (रा. हलखेडा) असे सांगितले.
या प्रकरणी पोलीस नाईक मनोज म्हस्के यांच्या फिर्यादीवरून काविन भोसले याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस हवालदार सुधाकर शिंदे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम