फोनपे स्कॅनद्वारे प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे उकळणारी तृतीयपंथीयांची टोळी गजाआड

बातमी शेअर करा...

फोनपे स्कॅनद्वारे प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे उकळणारी तृतीयपंथीयांची टोळी गजाआड

भुसावळ न्यायालयाने सुनावली एक महिन्याची शिक्षा

भुसावळ (प्रतिनिधी) – रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांना धमकावून ऑनलाईन स्वरूपात जबरदस्तीने पैसे वसूल करणाऱ्या तृतीयपंथीयांच्या टोळीचा रेल्वे सुरक्षा दलाने पर्दाफाश केला आहे. आठ जणांच्या या टोळीपैकी सहा तृतीयपंथी व दोन चालकांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध भुसावळ न्यायालयाने एक महिन्याची शिक्षा सुनावली आहे.

या टोळीने विशेषतः परप्रांतीय प्रवाशांना लक्ष्य करून, रोख रक्कम नसल्यास त्यांच्या समोर ‘फोनपे’ स्कॅनर दाखवून ₹१०० ते ₹२०० पर्यंतची रक्कम ऑनलाईन वसूल केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींच्या मोबाईलमध्ये अशा अनेक बेकायदेशीर व्यवहारांचे पुरावे आढळून आले असून, या प्रकरणाबाबत प्रवाशांनी सोशल मिडिया व रेल्वे हेल्पलाईनवर तक्रारी नोंदवल्या होत्या.

रेल्वेचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक के.एन. राय (क्राईम ब्रँच) आणि पी.आर. मीना यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने २५ व २६ जूनच्या रात्री कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले.

गुरुवारी चार तृतीयपंथी व दोन सहकाऱ्यांना भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना एक महिन्याची शिक्षा सुनावून जळगाव कारागृहात हलवण्याचे आदेश दिले.

रेल्वे सुरक्षेसाठी अशा बेकायदेशीर टोळ्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त जोशी यांनी दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम