
बकरी चारताना विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू राजदेहरे सेटलमेंट (चाळीसगाव) येथील घटना
बकरी चारताना विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू
राजदेहरे सेटलमेंट (चाळीसगाव) येथील घटना
चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील राजदेहरे सेटलमेंट येथे बकऱ्यांसाठी चारा घेताना विजेच्या शॉकने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. १५ जून रोजी घडली. छगन झिपा राठोड (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजदेहरे सेटलमेंट येथील अजय तोताराम राठोड यांच्या घराच्या पाठीमागे इलेक्ट्रिक डीपी (विज वितरण पेटी) आहे. याठिकाणी छगन राठोड हे नेहमीप्रमाणे बकऱ्यांसाठी चारा घेण्यासाठी गेले होते. मात्र, संबंधित डीपीची वायर कापलेली असल्याने ती उघडी पडली होती. दुर्दैवाने त्यांना त्या वायरचा शॉक लागला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. छगन राठोड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
या प्रकरणी प्रशासनाने योग्य चौकशी करून संबंधित विद्युत खात्याची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम