
बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज उचलले; तारण ठेवलेली मालमत्ता परस्पर विक्री, सहा जणांवर गुन्हा
बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज उचलले; तारण ठेवलेली मालमत्ता परस्पर विक्री, सहा जणांवर गुन्हा
जळगाव : बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेतल्याचा आणि तारण ठेवलेली मालमत्ता परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये एकाच दिवशी कर्ज घेतले असून, एकूण ३१ लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेडरल बँकेशी संलग्न असलेल्या फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेसच्या जळगाव कार्यालयातून योगेश भाऊराव गवांदे व भाग्यश्री गवांदे (रा. खडगाव, ता. जामनेर) यांनी ८ जून २०२२ रोजी १४ लाख ४३ हजारांचे कर्ज घेतले होते. त्यांनी सुरुवातीचे हप्ते नियमित भरले, मात्र ७ जून २०२३ नंतर हप्ते थकवले. कर्जासाठी गहाण ठेवलेली मालमत्ता पाहणीदरम्यान बनावट कागदपत्रांवर आधारित असल्याचे उघड झाले.
दुसऱ्या प्रकरणात आकाश गोरख पाटील, पूजा आकाश पाटील, गोरख खुशाल पाटील व सुनीता गोरख पाटील (सर्व रा. पाचोरा) यांनी देखील ८ जून २०२२ रोजी १७ लाख १९ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनीही सुरुवातीला नियमित हप्ते भरले, मात्र ९ जुलै २०२४ नंतर हप्ते थकवले. तपासणीअंती त्यांनी गहाण ठेवलेली मालमत्ता परस्पर विकल्याचे समोर आले.
या प्रकरणी दोन्ही कर्जदारांविरोधात शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम