
बनावट नोटांसह दोन आरोपी अटकेत; ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
बनावट नोटांसह दोन आरोपी अटकेत; ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (२७ जून) रात्री १० वाजता रंगेहाथ पकडले. या कारवाईत ८ हजार रुपयांच्या बनावट नोटा, एक दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन संशयित बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत रात्री १० वाजेच्या सुमारास दोघांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्यांची नावे अशी –
1. सचिन दरबारसिंग राजपूत (वय ३४, रा. रामेश्वर कॉलनी)
2. सचिन संजय गोसावी (वय २३, रा. वाघ नगर, जळगाव)
त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या १६ बनावट नोटा (एकूण ८ हजार रुपये), गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (क्र. एमएच १९ डीयू ७८०८) आणि दोन मोबाईल फोन असा एकूण ३६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम