बहादरपूर शिवारात अवैध देशी दारूचा कारखाना उध्वस्त; पोलिसांची मोठी कारवाई, ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा...

बहादरपूर शिवारात अवैध देशी दारूचा कारखाना उध्वस्त; पोलिसांची मोठी कारवाई, ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

पारोळा : पारोळा तालुक्यातील बहादरपूर शिवारातील बोरी नदीच्या काठावर उभारलेल्या अवैध देशी दारूच्या कारखान्यावर पारोळा पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत तब्बल ४० लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. ही धाड २७ ऑगस्ट रोजी करण्यात आली.

पोलिसांनी छापा टाकला असता राकेश छगनलाल जैन, टिन्या डेंगऱ्या पावरा आणि कितारसिंग गण्यासिंग पावरा हे तिघे कारखाना चालविताना आढळून आले. त्यांना घटनास्थळीच अटक करण्यात आली. या कारखान्यात अवैधरित्या टॅंगो पंच देशी दारू तयार करण्यात येत होती. पोलिसांनी कारखान्यातील मशिनरी, बाटल्या, रसायने, पॅकींग साहित्य, रिकाम्या व सीलबंद बाटल्या, बॅरल्स, पाण्याच्या टाक्या आदी मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले.

जप्त केलेल्या मुद्देमालात ९० एमएलच्या टॅंगो पंचच्या हजारो बाटल्या, २०० लिटर क्षमतेचे स्पिरीटचे बॅरल्स, पॅकींग व बॉटलिंगसाठी लागणारी यंत्रसामग्री, आरओ मशिन, सीएनसी मशिन, कॉम्प्युटराइज्ड सीलिंग व पॅकींग मशिन, पाण्याच्या टाक्या, मिक्सर, वीज पंप यांचा समावेश आहे. याशिवाय ६१ हजारांहून अधिक रिकाम्या बाटल्या, बुच, स्टिकर्स, तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्राची बोलेरो मालवाहू गाडी व स्विफ्ट डिझायर कारही जप्त करण्यात आली आहे.

पारोळा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम