बहिणाबाईंच्या कविता अमृताचा ठेवा  – रोटरी वाचन कट्ट्यात प्रा. संध्या महाजन 

बातमी शेअर करा...
बहिणाबाईंच्या कविता अमृताचा ठेवा  – रोटरी वाचन कट्ट्यात प्रा. संध्या महाजन 
जळगाव- बहिणाबाईंच्या कवितांचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा असून त्यामुळेच मला आज माझ्या समूहात बहिणाबाईंची लेक म्हणून ओळखले जाते. बहिणाबाईंची जागा कोणीही घेऊ शकणार नाही, असे प्रतिपादन  रोटरी वाचन कट्ट्यात प्रथितयश कवयित्री व साहित्यिक प्रा. संध्या महाजन यांनी केले.
            रोटरी क्लब जळगाव, व. वा. जिल्हा वाचनालय व बहिणाबाई चौधरी ट्रस्टच्या वतीने रोटरी वाचन कट्ट्याचे दुसरे पुष्प बहिणाबाई चौधरी यांचे वास्तव्य असलेल्या जुन्या जळगावातील चौधरी वाड्यात आयोजित करण्यात आले होते.
     यावेळी प्रा.महाजन  पुढे म्हणाल्या कि, बहिणाबाईंच्या कविता सादर करण्यास मला आमंत्रित केले जाते. मात्र रोटरी वाचन कट्ट्यात मला त्यांच्या कवितांचा माझ्यावरील प्रभाव मांडण्याची संधी दिली याचा विशेष आनंद आहे.
       माझी जागा कायम बहिणाबाईंच्या पायाशी आहे. त्यांच्या कवितांचा प्रभाव माझ्या कवितांवर आहे. महाविद्यालयाच्या दुसर्‍या वर्षात मला पहिल्यांदा बहिणाबाईंच्या कविता अभ्यासाला मिळाली आणि मी तिची झाले असे त्यांनी सांगितले.
          बहिणाबाईंच्या कविता अमृताचा ठेवा आहे. त्यांनी आपल्या बोलीतून मराठी भाषेला अधिक समृद्ध केले आहे. बहिणाबाई निरक्षर असल्या तरी त्या अशिक्षित नव्हत्या असेही प्रा. महाजन म्हणाल्या.
           बहिणाबाईंची निरीक्षण शक्ती अद्भुत होती. त्यांच्या कविता अष्टाक्षरी असून सर्व कविता एकाच तालात म्हणता येतात हे वैशिष्ट्य आहे असे सांगून त्यांनी यावेळी बहिणाईंच्या काही ओव्यांचाही संदर्भ दिला.
         बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे समन्वयक अशोक चौधरी यांनी ट्रस्ट आणि संग्रहालयाविषयी तसेच बहिणाबाईंवरील प्रकाशित साहित्याची प्रत्यक्ष साहित्य कृती दाखवून उपस्थितांना माहिती करून दिली.
               रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष गिरीश कुळकर्णी यांनी मान्यवरांचा परिचय करुन दिला व कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले.
            बहिणाबाईंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व. वा. जिल्हा वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिल शाह यांनी बहिणाबाईंनी वाचनालयाला ज्ञानमंदिर म्हटल्याची हृद्य आठवण सांगितली.
      कार्यक्रमास स्मिता चौधरी, साहेबराव पाटील, डॉ. वैभव सरोदे, डॉ.गौरी सरोदे, संदीप शर्मा, किशोर जाखेटीया, स्वाती ढाके, राकेश चव्हाण, कमलेश चांदवाणी, उल्हास सुतार, बिपिन काबरा, गणेश झंवर, देवेश चौधरी, लिशा चौधरी, अकोला येथील जुगल चिराणीया यासह अनेक वाचनप्रेमी उपस्थित होते.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम