
बहिणाबाई चौधरींच्या जयंतीनिमित्त २४ ऑगस्टला ‘हिरिताचं देनं घेनं’ काव्यसंध्येत काव्याचा होणार वर्षाव
बहिणाबाई चौधरींच्या जयंतीनिमित्त २४ ऑगस्टला
‘हिरिताचं देनं घेनं’ काव्यसंध्येत काव्याचा होणार वर्षाव
जळगाव, दि. २१ (प्रतिनिधी) : बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त ‘हिरिताचं देनं घेनं’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा काव्यपूर्ण कार्यक्रम २४ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता भाऊंचे उद्यान, काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे होणार आहे. तत्पूर्वी सकाळी १० वाजता चौधरी वाड्यातील बहिणाबाई स्मृती संग्रहालयात ‘बहिणाईंचे भावविश्व’ हा कार्यक्रम ही आयोजण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी किरण डोंगरदिवे (बुलढाणा) आणि कवयित्री रेणुकाजी पुरोहित (पुणे) उपस्थित राहणार आहेत.
‘निसर्गकन्या’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहिणाबाईंच्या ओव्या आजही जनमानसात जीवंत आहेत. त्यांच्या काव्य साहित्यातून श्रमजीवी जीवन, निसर्गाचे सौंदर्य, स्त्रियांचे भावविश्व आणि ग्रामीण संस्कृती यांचे प्रतिबिंब उमटते. या काव्यसंध्यात प्रांतातील नामवंत कवी, नवोदित कवयित्री आणि बहिणाबाईंच्या प्रेरणेने स्फुरलेले शब्दकार सहभागी होतील. सायंकाळी आयोजलेल्या कार्यक्रमास किरण डोंगरदिवे, बुलढाणा, सौ. रेणुकाजी पुरोहित, पुणे, सौ. श्रध्दा कुळकर्णी, श्रीमती विमल वाणी, श्रीमती माया धुप्पड या मान्यवरांचा सहभाग असणार आहे,
श्रावणातले आल्हाददायक, निसर्गसौंदर्य, मातीचा गंध आणि अंतर्मनाची ओल यांसारख्या विविध विषयांवरील विविध बाज असलेल्या कविता रसिकांसमोर सादर होतील. साहित्यप्रेमी, रसिक श्रोते आणि काव्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बहिणाबाईंच्या स्मृतीला काव्याभिवादन करावे, असे आवाहन बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे समन्वयक अशोक चौधरी यांनी केले आहे. कार्यक्रमात काव्याचा अनोखा वर्षाव अनुभवण्याची संधी मिळेल.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम