
बांधकामस्थळी विजेचा धक्का लागून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील गजानन महाराज मंदिराजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना विजेचा धक्का लागून एका परप्रांतीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (१९ जुलै) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत तरुणाचे नाव विनायक नानु उईके (वय २०, रा. खंडवा, मध्यप्रदेश, सध्या रा. अमळनेर) असे असून तो अमळनेर शहरात मजुरीसाठी वास्तव्यास होता.
प्राप्त माहितीनुसार, विनायक उईके हा गजानन महाराज मंदिर परिसरात सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामस्थळी सेंट्रींगच्या कामासाठी लोखंडी सळई दोरीच्या साहाय्याने वर ओढत होता. यादरम्यान लिफ्टच्या सुरू असलेल्या विद्युत तारेला सळईचा स्पर्श झाल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला.
अपघातानंतर सहकाऱ्यांनी त्याला तत्काळ अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, बांधकामस्थळी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात हलगर्जीपणा झाल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम