
बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारताना सुरक्षारक्षकाचा दुर्दैवी मृत्यू
जळगावातील गिरणाई कॉलनीतील घटना, तोल गेल्याने दुसऱ्या मजल्यावरून पडला
बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारताना सुरक्षारक्षकाचा दुर्दैवी मृत्यू
जळगावातील गिरणाई कॉलनीतील घटना, तोल गेल्याने दुसऱ्या मजल्यावरून पडला
जळगाव (प्रतिनिधी): शहरातील चंदूअण्णा नगर परिसरातील गिरणाई कॉलनीत रविवारी रात्री दुर्दैवी घटना घडली. बांधकामाच्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर पाणी मारताना तोल जाऊन पडल्याने सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना रात्री ९ वाजता घडली असून, याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनोहर ढेमा बारेला (वय ३०, रा. उंबऱ्या, ता. भगवानपूर, जि. खरगोन, मध्यप्रदेश) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गेल्या दीड वर्षांपासून ते शहरातील नरेंद्र साळुंखे यांच्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते.
कशामुळे झाला अपघात?
रविवारी रात्री नेहमीप्रमाणे बांधकामावर पाणी मारत असताना तोल गेल्याने मनोहर बारेला दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली पडले. खाली वाळू आणि इतर बांधकाम साहित्य असतानाही ते वॉल कंपाऊंडच्या भिंतीवर आदळले, त्यामुळे डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे बोलले जात आहे.
अपघातानंतर त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम