
बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्याची आत्महत्या
बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्याची आत्महत्या
ममुराबादमध्ये हृदयद्रावक घटना
जळगाव | प्रतिनिधी – बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने मानसिक तणावात गेलेल्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना ममुराबाद (ता. जळगाव) येथे सोमवारी, ५ मे रोजी उघडकीस आली. ही घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली असून, दोन दिवसांत जिल्ह्यातील ही दुसरी अशा स्वरूपाची दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे पालक, शिक्षक आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.
मृत विद्यार्थ्याचे नाव ऋषिकेश दिनेश पाटील (वय १७, रा. ममुराबाद) असे असून तो विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. बारावीचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर झाला आणि ऋषिकेशला अपेक्षेपेक्षा कमी — केवळ ४९ टक्के — गुण मिळाले. या धक्क्याने तो नैराश्यात गेला आणि घराच्या दुसऱ्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी दीड वाजता आईच्या लक्षात आली.
घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऋषिकेशचा मोठा भाऊ फार्मसीचे शिक्षण घेत असून संपूर्ण कुटुंब गहिवरून गेले आहे. परिसरात शोककळा पसरली असून, जिल्हा रुग्णालयात नातेवाईक व मित्रांनी गर्दी केली होती.
या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येत आहे. याआधी एरंडोल तालुक्यातील एका विद्यार्थ्यानेही पाचोरा येथे बहिणीच्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम