
बालरंगभूमी परिषद जळगावतर्फे मराठी बालनाट्य दिवस उत्साहात साजरा
बालरंगभूमी परिषद जळगावतर्फे मराठी बालनाट्य दिवस उत्साहात साजरा
जळगाव (प्रतिनिधी) : मराठी रंगभूमीवर बालनाट्याला ६६ वर्षांची परंपरा लाभली आहे. ही समृध्द परंपरा ज्या दिवशी सुरु झाली. तो दिवस म्हणजे २ ऑगस्ट १९५९. या दिवसाची आठवण म्हणून बालरंगभूमी परिषदेकडून २ ऑगस्ट हा मराठी बालनाट्य दिवस म्हणून जाहीर करण्यात आला. त्याला मान्यताही मिळाली. आज बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेतर्फे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन हा दिवस साजरा करण्यात आला.
सकाळी ८ वाजता शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगमंच पूजन करुन व स्व.रत्नाकर मतकरी आणि स्व.सुधाताई करमरकर यांना आदरांजली वाहून या दिवसाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवजीवन प्लस सुपरशॉपचे संचालक अनिलभाई कांकरिया, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, सुभाष मराठे, शरद पांडे, कलादर्श स्मृतिचिन्हचे सचिन चौघुले यांच्यासह बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष (प्रशासन) हनुमान सुरवसे, उपाध्यक्ष (उपक्रम) अमोल ठाकूर, कोषाध्यक्ष सचिन महाजन, कार्यकारिणी सदस्य दिपक महाजन, अवधूत दलाल, दर्शन गुजराथी, आकाश बाविस्कर, राहुल पवार, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, हर्षल पवार, मोहित पाटील, सुरेखा मराठे आदी उपस्थित होते.
त्यानंतर निर्गुणी बारी हिने नाट्यछटा तर केतकी राजेश कोरे हिने फुलराणी नाटकातील स्वगत सादर केले. आषाढी एकादशी निमित्त बालरंगभूमी परिषदेने घेतलेल्या संत वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर शहरातून काढण्यात येणाऱ्या बालनाट्य दिंडीत सहभागी झालेल्या गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यालय, स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय तसेच उत्कर्ष मतिमंद विद्यालयांचा स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. बालनाट्य दिंडी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहापासून निघून काव्यरत्नावली चौक येथे दिंडीचा समारोप करण्यात आला. दिंडी समारोपप्रसंगी जळगावातील रंगकर्मी अनंत (बंटी) जोशी यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बांबरुड बु., तालुका भडगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थानिक संबळ वादन कलावंत सुनिल सरदार यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक व बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे सदस्य एकनाथ गोफणे, शिक्षक मनोज पाटील, दिनकर महाजन, प्रियंका जाधव व बालकलावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालरंगभूमी परिषद जळगावचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी केले तर आभार अध्यक्ष योगेश शुक्ल यांनी मानले.
यावेळी माधवी सुतार या विद्यार्थिनीने हेल्मेट वापराचं महत्व सांगणारी ‘जरा डोकं चालवा ‘ ही नाट्यछटा सादर केली. चौथीच्या विद्यार्थांनी स्वच्छतेचं महत्व सांगणारी लघुनाटिका सादर केली. इयत्ता ३री व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षण विषयक लघुनाटिका सादर केली तर पहिलीच्या विद्यार्थीनीने पाणी बचत संदेश देणारं एकपात्री सादर केलं. या सांस्कृतिक कार्यक्रमात दिव्यानी महाजन, माहेश्वरी पाटील, रुद्र मोरे, निलेश कोळी, विक्रांत कोळी, घनशाम माळी, पूर्वा पाटील, लावण्या कोळी, अश्वघोष पगारे, मोहिनी कोळी, मयुर सरदार, रुद्र खैरनार आदि विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सर्व लघुनायिकांचे लेखन व दिग्दर्शन एकनाथ गोफणे यांनी केले होते. शिक्षक मनोज पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मराठी बालनाट्य दिवसाविषयी सविस्तर माहिती दिली. सांस्कृतिक कलाविष्कारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याना शाळेतर्फे लेखन साहित्य पारितोषिक स्वरुपात देण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम