
बॅटरी चोरी प्रकरणी दोन आरोपी जेरबंद; ६.३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
बॅटरी चोरी प्रकरणी दोन आरोपी जेरबंद; ६.३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील अजिंठा चौफुली परिसरात असलेल्या चौधरी बॅटरी ट्रेडिंग दुकानातून ४१ जुन्या बॅटऱ्या चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी जलद कारवाई करत अवघ्या २४ तासांत दोन संशयितांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ६.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१७ मे रोजी मध्यरात्री अब्दुल्ला किताबुल्ला चौधरी यांच्या दुकानाचे लोखंडी शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी बॅटऱ्या चोरल्या होत्या. १९ मे रोजी या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तपास सुरू केला.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांनी पांढऱ्या बोलेरो पिकअपचा (एमएच ३० व्हीडी ६८७३) वापर केल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथून अजमदउल्ला अमानतउल्ला खान (२४, रा. पिंपळगाव राजा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि सैय्यद दानिश सैय्यद इस्माईल (२५, रा. घोडेगाव, ता. तेल्हारा, जि. अकोला) यांना अटक केली.
२० मे रोजी अटकेनंतर आरोपींकडून चोरीस गेलेल्या ३१ हजार रुपये किमतीच्या विविध कंपन्यांच्या बॅटऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप असा एकूण ६,३१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पो. उप. नि. राहुल तायडे, चंद्रकांत धनके, स. पो. उ. नि. दत्तात्रय बडगुजर, पो. ना. प्रदीप चौधरी, पो. को. सिद्धेश्वर डापकर, रतन गिते आणि योगेश बारी यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम