
बेंडाळे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा
बेंडाळे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा
जळगाव: येथील डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या (स्वायत्त) जिमखाना विभागातर्फे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करून ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. जे. पाटील होते.
कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर प्राचार्य डॉ. व्ही. जे. पाटील यांच्या हस्ते बास्केटबॉल आणि धावण्याच्या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. या स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
यावेळी उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना मेजर ध्यानचंद यांचे खेळातील योगदान आणि महिलांच्या आरोग्यासाठी व्यायामाचे महत्त्व सांगितले. त्यांनी विद्यार्थिनींना क्रीडा क्षेत्राला करिअर म्हणून निवडण्याचा मोलाचा सल्ला दिला.
कार्यक्रमासाठी विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. पी. एन. तायडे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन क्रीडा संचालिका डॉ. अनिता कोल्हे यांनी केले, तर आभार प्रा. छाया चिरमाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय सुरवाडे यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थिनी व खेळाडूंच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत हा दिवस यशस्वीरित्या साजरा झाला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम