
बेटावद मॉब लिंचिंग : मुख्य आरोपी अजूनही मोकाट; एकता संघटनेचा अजित पवारांना जाब
बेटावद मॉब लिंचिंग : मुख्य आरोपी अजूनही मोकाट; एकता संघटनेचा अजित पवारांना जाब
जामनेर: येथील बेटावद खुर्द येथे घडलेल्या मॉब लिंचिंग घटनेला सहा दिवस उलटले असतानाही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोकाटच आहे. काही आरोपींना अटक झाली असली तरी, स्थानिक राजकारण्याशी संबंधित आणि एका संघटनेचा पदाधिकारी असलेला मुख्य आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. यामुळे संतापलेल्या जळगाव जिल्हा एकता संघटनेने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जाब विचारला आहे.
मुख्य आरोपीवर कारवाई का नाही?
उपलब्ध साक्षीदार, पुरावे आणि पीडितांच्या तक्रारी असूनही मुख्य आरोपीला अटक करण्याचे टाळले जात असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. याशिवाय, गुन्ह्याचे स्वरूप पाहता भारतीय दंड संहिता कलम ६१(२) आणि कठोर असा ‘मकोका’ (MCOCA) कायदा लागू करण्याची मागणीही दुर्लक्षित केली जात असल्याचा दावा संघटनेने केला आहे. या सर्व बाबींवरून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकता संघटनेच्या प्रमुख मागण्या :
या प्रकरणाच्या गांभीर्यावर जोर देण्यासाठी, संघटनेने अजित पवारांना एक लेखी तक्रार अर्ज दिला. त्यात त्यांनी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
- तपासी अधिकाऱ्याची बदली: या प्रकरणाचा तपास तात्काळ पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्याकडून काढून तो डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवावा.
- मुख्य सूत्रधारास अटक: फरार असलेल्या मुख्य आरोपीस तात्काळ अटक करावी.
- मकोका लागू करा: या गुन्ह्यासाठी ‘मकोका’ कायद्यांतर्गत कारवाई सुरू करावी.
- पीडित कुटुंबाला न्याय: पीडित कुटुंबाला संरक्षण, न्याय, तसेच २५ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी द्यावी.
- जलद खटला: खटल्याची सुनावणी जलदगतीने करण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी.
अजित दादांचे कारवाईचे आश्वासन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत हे कृत्य महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारे असल्याचे म्हटले. त्यांनी तातडीने जळगावचे पोलीस अधीक्षक आणि राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी बोलून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात मुफ्ती खालिद, फारूक शेख, नदीम मलिक, फिरोज शेख, कासिम उमर, जावेद मुल्ला, तसेच धुळे, नंदुरबार आणि जळगाव येथील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या घटनेमुळे अल्पसंख्याक समाजात निर्माण झालेली भीती आणि असुरक्षितता दूर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम