
बोदवड न्यायालयात ‘संविधान-पर्व : न्यायदेवतेसमोर लोकशाहीचा जागर!
बोदवड न्यायालयात ‘संविधान-पर्व : न्यायदेवतेसमोर लोकशाहीचा जागर!
संविधान नसते, तर न्याय रस्त्यावर झाला असता – ॲड. अर्जुन पाटील
न्यायाधीश ए. पी. खोलम यांच्या उपस्थितीत संविधान दिनाचा उत्साह; ‘उद्देश पत्रिके’चे वाचन व शपथ!
बोदवड प्रतिनिधी :-
बोदवड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात भारतीय संविधानाचा ६९ वा वर्धापन दिन अर्थात ‘संविधान दिवस’ आज (२६ नोव्हेंबर) दुपारी २ वाजता अत्यंत गौरवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून संविधानाने दिलेल्या ‘जनतेच्या सार्वभौमत्वा’वर व मूलभूत मूल्यांवर प्रकाश टाकण्यात आला.
संविधान पूजनाने झाली कार्यक्रमाची सुरुवात :- न्यायालयाचे न्यायाधीश ए. पी. खोलम यांच्या हस्ते प्रथम भारतीय संविधानाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर न्यायाधीश खोलम साहेब यांनी स्वतः संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे (Preamble) वाचन करून उपस्थितांना संविधानाचे पालन करण्याची आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याची शपथ दिली.
‘संविधानामुळेच जनता सार्वभौम’:- बोदवड वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील यांनी आपल्या प्रभावी भाषणात संविधानाच्या आवश्यकतेवर जोर दिला. ते म्हणाले, “भारतासारख्या विशाल लोकशाही देशात संविधान नसते, तर लोकांना न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले असते. आज न्यायव्यवस्था, प्रशासकीय यंत्रणा आणि प्रत्येक नागरिकाला असलेले मूलभूत हक्क हे केवळ संविधानामुळेच सुरक्षित आहेत.” त्यांनी मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि नीतीची मार्गदर्शक तत्त्वे यावर सविस्तर भाष्य केले. संविधानामुळेच आज देशातील जनता खऱ्या अर्थाने सार्वभौम आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
मान्यवरांची उपस्थिती व समारंभाचे नियोजन :- या कार्यक्रमाला वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. धनराज प्रजापती, सचिव ॲड. किशोर महाजन, सरकारी वकील दिलीप वळवी, वरिष्ठ वकील पी. आर. मोझे, ॲड. के. एस. इंगळे, ॲड. आय. डी. पाटील, ॲड. मीनल अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, भुसावळ आणि जामनेर येथील ॲड. मिलिंद पाटील, ॲड. महेश चौधरी आणि ॲड. विकास चौधरी यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. धनराज प्रजापती यांनी केले, तर ॲड. के. एस. इंगळे यांनी संविधानिक तरतुदींवर माहिती दिली. ॲड. किशोर महाजन यांनी आभार प्रदर्शन केले.
खुशी जैन, अश्विनी सोनार, सुरज अंजनसोंडे, साहिल शाह या वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी न्यायालयीन अधीक्षक वैभव तरटे, अविनाश राठोड, व कर्मचारी वर्गाने प्रयत्न केले.याप्रसंगी न्यायालयीन कर्मचारी वर्ग आणि मोठ्या प्रमाणावर पक्षकार वर्ग उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम