
बोदवड रेल्वे ब्रीजच्या कामावर गुणवत्तेचा प्रश्न; ठेकेदाराच्या दादागिरीने वाद निर्माण
बोदवड रेल्वे ब्रीजच्या कामावर गुणवत्तेचा प्रश्न; ठेकेदाराच्या दादागिरीने वाद निर्माण
जळगाव (विशेष प्रतिनिधी) –
बोदवड येथील रेल्वे ओव्हरब्रीजचे काम अलीकडेच पूर्णत्वास आले असले तरी या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांत तीव्र नाराजी असून, बांधकामातील अनेक त्रुटी समोर आल्याने हा ब्रीज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या कामासंबंधी ठेकेदार संस्था बी. आर. भदाणे (धुळे) यांच्यावर गंभीर आरोप होत असून, स्थानिक राजकीय नेत्यांपासून ते अभियंतेही या प्रकरणात धुसफूस करताना दिसत आहेत.
या संस्थेने बोदवडसह निंभोरा, सावदा, म्हसावद येथील रेल्वे ब्रीजची कामे घेतली असून, बोदवड प्रकल्पात विशेषतः दर्जा आणि सुरक्षा नियमांचे सातत्याने उल्लंघन झाल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनीच वरिष्ठ स्तरावर केली आहे. मात्र अद्यापही या तक्रारींवर ठोस कारवाई होत नसल्याने ही बाब अधिकच संशयास्पद ठरत आहे.
‘आम्ही भाजपचे’ – ठेकेदाराच्या हस्तकाची दर्पोक्ती
स्थानिक सूत्रांनुसार, संबंधित ठेकेदाराचा एक हस्तक जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागात ‘आम्ही तर भाजपचे, आमचे काय होणार?’ असा दर्प दाखवत काम करत असून, विभागीय अभियंत्यांचे लेखी व तोंडी आदेशही धुडकावत आहे. जळगाव उत्तर विभागातील कार्यकारी, उपविभागीय व शाखा अभियंत्यांनी वेळोवेळी सुचना दिल्या असूनही कामात सुधारणा झालेली नाही.
राजकीय संलग्नता आणि प्रशासनाचे दुर्लक्ष
या ठेकेदाराचे वरिष्ठ भाजपा नेते आणि बांधकाम विभागातील अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या संस्थेच्या कामांवरील तक्रारी दुर्लक्षित केल्या जात असल्याचा आरोप इतर ठेकेदारांकडून होत आहे. जिल्ह्यात शेकडो कोटींची कामे करणाऱ्या या संस्थेविरोधात आधीही अनेक तक्रारी आल्या आहेत, मात्र त्याकडे डोळेझाक केली जात असल्याचे दिसून येते.
“हाताची घडी, तोंडावर बोट” – कार्यकारी अभियंता कोरके यांची प्रतिक्रिया
या वादग्रस्त कामाबाबत विचारले असता कार्यकारी अभियंता यशवंत कोरके यांनी, “कागदोपत्री सर्व काही नियमांनुसार आहे, ठेकेदाराला वेळोवेळी सुचना दिल्या आहेत. अपेक्षित दर्जाचे काम होत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र ठेकेदार व अधिक्षक अभियंता यांच्यातील कथित हितसंबंधांबाबत विचारले असता त्यांनी “हाताची घडी तोंडावर बोट” अशीच प्रतिक्रिया दिली.
कारवाईची अपेक्षा
ठेकेदारी प्रक्रियेतील अशा मनमानी वृत्तीविरोधात आता अन्य ठेकेदारांतूनही संताप व्यक्त होऊ लागला आहे. भदाणे नामक एजन्सीच्या कामकाजावर योग्य ती चौकशी होऊन, दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींमधून केली जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम