
भडगांव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
भडगांव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
भडगाव-प्रतिनिधी
भडगांव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ साठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण सत्र आज दि.२९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून तालुका क्रिडा संकुल पाचोरा रोड,भडगांव येथे संपन्न झाले.भडगांव न.पा. निवडणूकीसाठी शहरातील विविध प्रभागात एकुण ४३ मतदान केंद्र असणार असून त्यासाठी ३३०मतदान कर्मचारी तसेच ६ सेक्टर अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यांना मतदान प्रक्रिया पार पाडणे संदर्भात सविस्तर मार्गदर्शन निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार शितल सोलाट यांनी केले. तसेच मतदान यंत्र हाताळणीचे सविस्तर प्रशिक्षण सहाय्यक निवडणुक अधिकारी अनिल भामरे यांनी दिले. मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिये दरम्यान करावयाचे विविध प्रकारचे घोषणापत्रे,भरावयाचे विविध नमुने इ.बाबत मार्गदर्शन अति.सहा.निवडणुक निर्णय अधिकारी स्वालिहा मालगावे यांनी केले. प्रशिक्षण सत्रात मतदानासाठी नियुक्त कर्मचारी यांची मतदाना संदर्भातील विविध प्रश्नांची चाचणी परिक्षा देखील घेण्यात आली.
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान दि.०२/१२/२०२५ रोजी सकाळी ७.३०ते सायं.५.३० या कालावधीत होणार असून सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक साहित्य व मतदान पथके दि.१ रोजी भडगांव तालुका क्रिडा संकुल येथून मतदान केंद्रांवर रवाना करण्यात येणार आहेत. त्याकामी आवश्यक वाहनांची सोय करण्यात आलेली आहे.
दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी
भडगांव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक करीता दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी भडगांव तालुका क्रिडा संकुल येथे होणार असून, मतमोजणीकरीता ६० कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले असून मतदान यंत्रावरील मतमोजणीसाठी ६ टेबल व पोस्टल मतदानासाठी १ टेबल अश्या एकुण ७टेबल द्वारे मतमोजणीच्या ७ ते ८फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीत साधारण ३ ते ४ प्रभागांचे निकाल प्राप्त होणार आहेत. भडगांव नगरपरिषदेची मतदान विषयक कामकाज व मतमोजणी भडगांव तालुका क्रिडा संकुल पाचोरा रोड भडगांव येथून होणार असल्याने तेथे प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात येत आहे. अशी माहिती नगरपरिषदेचे नितीन पाटील यांनी दिली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम