भडगाव-पारोळा मार्गावर एसटी बस-टेंपोचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पाच जखमी

बातमी शेअर करा...

भडगाव-पारोळा मार्गावर एसटी बस-टेंपोचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पाच जखमी

 

जळगाव: भडगाव-पारोळा मार्गावर वाघरे गावाजवळ आज पहाटेच्या सुमारास एसटी बस आणि एका खासगी टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला असून, पाचहून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आज, २० ऑगस्ट रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास, सोयगावहून धुळ्याकडे निघालेली एसटी बस (क्र. MH-14-BT-1984) वाघरे गावाजवळ समोरून येणाऱ्या खासगी टेम्पोला (क्र. MH-19-CY-1606) जोरदार धडकली. धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहनांमधील अनेक प्रवासी जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने मदतकार्य सुरू केले. जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या विनामूल्य रुग्णवाहिका सेवेच्या चालकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेचे चालक आशुतोष शेलार यांनी जखमींना तातडीने पारोळा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी इतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या अपघातात पंकज पाटील (३०, रा. उंदीरखेडा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जखमींमध्ये मिराबाई पंढरी सोनवणे, निलाबाई घनश्याम सिरसागर, अंजनाबाई रघुनाथ पाटील, मनोहर सजन पाटील, रमेश धोंडू चौधरी, मीराबाई रघुनाथ पाटील, जानवी संतोष मोरे, आणि रघुनाथ गणपंत सोनवणे यांचा समावेश आहे. या जखमींवर पारोळा आणि भोले विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींना मदत करण्यासाठी सागर मराठे आणि यश ठाकूर यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

काही जखमींची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम