भरधाव कारची रिक्षाला जोरदार धडक; एकाचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

बातमी शेअर करा...

भरधाव कारची रिक्षाला जोरदार धडक; एकाचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

जामनेर–भुसावळ रस्त्यावर भीषण अपघात

जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर–भुसावळ रस्त्यावर गारखेडा शिवारात साई धाब्याजवळ रविवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. भरधाव वेगात असलेल्या कारने समोरून येणाऱ्या पॅजो रिक्षाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. विशेष म्हणजे अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढत जखमींना कोणतीही मदत न करता पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपी चालकाला अटक केली आहे.

या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०५(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४(अ) व १३४(ब) प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जामनेर–भुसावळ मार्गावरील गारखेडा शिवारात हा अपघात घडला. एमएच १९ सीएक्स २१८१ क्रमांकाची कार अतिवेगात चालवली जात होती. चालकाने वेगावर नियंत्रण न ठेवता समोरून येणाऱ्या एमएच १९ व्ही ३७०४ क्रमांकाच्या पियागो रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षामधील प्रवासी गंभीर जखमी झाले.

अपघातात गोपाल राजाराम बारी (वय ५९, रा. फेकरी, दिपनगर, ता. भुसावळ) यांचा मृत्यू झाला, तर सौ. संगीता सुभाष चौधरी (वय ४९, व्यवसाय गृहिणी, रा. रामनगर, छत्रपती संभाजीनगर) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर कारचालकाने पोलिसांना माहिती न देता तसेच जखमींना वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. मात्र तपासादरम्यान पोलिसांनी कारचालक निकिता गोपाल निंबाळकर, सरला गोपाल निंबाळकर (दोघे रा. चिचखेडा, ता. जामनेर) आणि प्रमोद श्रीराम गुरुभैया (रा. तळेगाव, ता. जामनेर) यांच्याशी संबंधित माहितीच्या आधारे कारवाई करत चालकाला ताब्यात घेतले. आरोपीस दि. १४ डिसेंबर रोजी रात्री १२.०८ वाजता अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील शिंदे करीत आहेत. भरधाव वेग आणि निष्काळजी वाहनचालकामुळे निष्पाप व्यक्तीचा बळी गेल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम