
भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
जळगाव : अजिंठा चौफुलीकडून इच्छादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव मालवाहू वाहनाने दुचाकीला कट मारून जोरदार धडक दिल्याने दोन मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना दि. २५ रोजी दुपारच्या सुमारास घडली. अपघातानंतर वाहन चालक पसार झाला असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी येथील फैज नासीर खान (वय ४२) हा त्याचा मित्र आरिफ शेख अब्दुल रेहमान (वय २५, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) याच्यासोबत (एमएच ०४, जेडी २८९२) क्रमांकाच्या दुचाकीने इच्छादेवीकडे जात होता. दरम्यान, मागून भरधाव वेगाने आलेल्या (एमएच १९, सीवाय ७४८९) क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला कट मारत जोरदार धडक दिली.
या अपघातात फैज नासीर खान व त्याचा मित्र आरिफ शेख हे दोघे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर मालवाहू वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला.
या संदर्भात फैज नासीर खान यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस नाईक पंकज पाटील तपास करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम