भरधाव लक्झरीची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा...

भरधाव लक्झरीची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

अमळनेर | प्रतिनिधी तालुक्यातील गडखांब रस्त्यावर भरधाव लक्झरी बसने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. १८) सायंकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गडखांब येथील दिनेश सदाशिव पाटील (वय २६) हा तरुण सायंकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या दुचाकी (क्रमांक एमएच १९ सीपी २९८७) वरून गडखांब येथून दहिवद फाट्याकडे जात होता. त्यावेळी चोपड्याकडून अमळनेरकडे वेगाने जाणाऱ्या राजमुद्रा लक्झरी बस (क्रमांक एमएच ०९ ईएम ९०६३) ने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडकेनंतर बसने दुचाकी आणि चालकास तब्बल ५० फूट फरफटत नेले, ज्यामुळे दिनेश पाटील गंभीर जखमी झाला. घटनेनंतर मागून येणारे त्याचे काका विनोद पाटील आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ बस थांबवून दिनेशला बाहेर काढले. मात्र, अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी मयताच्या काका विनोद भागवत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांनी लक्झरी चालक चुनीलाल सुभाष बडगुजर (रा. चोपडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हे.कॉ. विजय भोई करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम