
भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू
अज्ञात वाहन चालक फरार; परिसरात शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील रामदेववाडी परिसरात बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात मुकेश अभिसिंग राठोड (वय २१) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पायी जात असलेल्या मुकेशला जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आणि उपचारासाठी नेण्यापूर्वीच टायचा मृत्यू झाला. . ही दुर्घटना २९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली असून, याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत मुकेश राठोड हा रामदेववाडी (ता. जळगाव) येथील रहिवासी असून, आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. उपजीविकेसाठी तो बांधकाम क्षेत्रात बिगारीचे काम करत होता. बुधवारी रात्री तो गावातील चायनीज दुकानावरून नाश्ता करून पायी घरी जात असताना, मागून आलेल्या एका भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
या धडकेत मुकेश रस्त्यावर दूर फेकला गेला आणि गंभीर जखमी झाला. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पसार होत पळ काढला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत मुकेशला जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून वाहनचालकाचा शोध सुरू आहे.
मुकेशच्या निधनाने संपूर्ण रामदेववाडी परिसरात शोककळा पसरली आहे. एकुलता एक मुलगा गमावल्याने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावकऱ्यांनी आरोपी वाहनचालकाला तातडीने अटक करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम
