
“भाजपने स्वबळाची तयारी केल्यास मीही तयार” – आमदार किशोर पाटील यांचा इशारा
पाचोरा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्यास आपणही स्वबळाची तयारी केल्याचा इशारा आमदार किशोर पाटील यांनी दिला आहे. स्वबळावर निवडणूक झाल्यास आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे महत्त्वाचे विधान केले.
आमदार किशोर पाटील म्हणाले, “जर भाजपने स्वबळाचे संकेत दिले असतील, तर मी देखील माझ्या कार्यकर्त्यांसह स्वबळावर लढायला तयार आहे. माझ्यासमोर कोणतीही अडचण नाही, उलट त्यांच्यासमोर आहे. ‘वैशुताई, दिलीपभाऊ, अमोलभाऊ माझे इतके कार्यकर्ते घ्या’, असे म्हणतील, पण भाजपच्या खऱ्या निष्ठावानांचे काय? हे तिन्ही नेते उपरे आहेत, त्यांचा भाजपशी काही संबंध नाही. भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना जर आजही ‘झवऱ्या, पट्ट्या’ उचलायच्या असतील, तर त्यांनी बाजूलाच थांबावे आणि या उपऱ्यांच्या मागे जावे,” अशा कठोर शब्दांत त्यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली.
“जनता आणि कार्यकर्ते माझ्यासोबत”
कोण कोणत्या पक्षात जात आहे, याची मला पर्वा नाही. माझ्या मतदारसंघातील जनतेवर आणि कार्यकर्त्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. तिकडे नेते असतील, पण जनता आणि कार्यकर्ते खऱ्या अर्थाने किशोर पाटील यांच्या पाठीशी आहेत. रोज ५० ते १०० कार्यकर्ते माझ्या पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे तिकडे नेते असतील, पण इकडे कार्यकर्ते आहेत, आणि त्यांच्याच भरवशावर माझी वाटचाल पुढे सुरू राहील, असेही ते म्हणाले.
दरम्यान, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, महायुती एकत्रितपणे लढणार की स्वबळावर, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम