
भाजपमध्ये गटबाजी उफाळली ; निष्ठावंत कार्यकतें शिंदे सेनेत दाखल
भाजपमध्ये गटबाजी उफाळली ; निष्ठावंत कार्यकतें शिंदे सेनेत दाखल
जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपने सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्षांतून कार्यकर्ते घेण्याची आक्रमक रणनीती आखली आहे. मात्र, पक्षातच सुरू झालेल्या अंतर्गत गटबाजीमुळे भाजपला मोठा धक्का बसला असून काही निष्ठावान पदाधिकाऱ्यांनीच महायुतीतील शिंदे गटात प्रवेश करून नाराजीचा सूर स्पष्ट केला आहे.
महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात लोकसभा व विधानसभेत यशस्वी जुळवाजुळव झाली होती. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांत जागा वाटपावरून स्पर्धा सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष अधिकाधिक जागांवर लढण्याची तयारी दर्शवत असून त्यासाठी ताकदवान उमेदवार शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये भाजप आघाडीवर असून गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटातील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मात्र, या घडामोडींमध्ये भाजपमध्येच अंतर्गत असंतोष निर्माण झाला आहे. वरिष्ठ नेतृत्वाच्या मर्जीविरुद्ध काम करणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे जुने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. परिणामी भाजप सोशल मीडिया आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, वसंतवाडीचे सरपंच विनोद पाटील, ग्रामपंचायत सदस्य सागर ठोसरे आणि सोपान सूर्यवंशी यांनी थेट शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. या सर्वांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश करून भाजपला मोठा धक्का दिला आहे.
यासंदर्भात दीपक पाटील म्हणाले, “भाजपमध्ये अनेक वर्षे निष्ठेने काम केल्यानंतरही अलीकडे निष्ठावान कार्यकर्त्यांची अवहेलना सुरू झाली आहे. पक्षातील काही पदाधिकारी मनमानी करत असून त्यांच्या वागणुकीमुळे आम्हाला बाजूला सारले जात होते. त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.”
पक्ष विस्ताराच्या प्रयत्नात असलेल्या भाजपसाठी ही अंतर्गत गटबाजी चिंतेचा विषय ठरत असून आगामी निवडणुकांपूर्वी पक्षाला संघटनात्मक पातळीवर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम