
भारतात ज्योतिष शास्त्राला अधिक महत्व – अभिनेते मुकेश खन्ना यांचे प्रतिपादन
भारतात ज्योतिष शास्त्राला अधिक महत्व – अभिनेते मुकेश खन्ना यांचे प्रतिपादन
वसंत दामोदर भट, चंद्रकांत शेवाळे, वि. शं. अष्टेकर आणि श्रीमती प्रतिभा शाहू मोडक यांचा विधिलिखित ज्योतिष महर्षी पुरस्कार देऊन गौरव
पुणे प्रतिनिधी
भारतामध्ये अन्य शास्त्रांच्या बरोबरच ज्योतिष शास्त्राची परंपरा मोठी असून त्याचे महत्व अधिक असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेते आणि महाभारत मालिकेतील भीष्माचार्य मुकेश खन्ना यांनी शनिवारी व्यक्त केले. आदिनाथ साळवी व ॲड. वैशाली साळवी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या “विधिलिखित ज्योतिष त्रिदशकोत्तर सोहळा -२०२५” या कार्यक्रमाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी शशिकांत वामन पवार, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, डॉ. दत्तप्रसाद चव्हाण, विधिलिखित संस्थेचे संस्थापक आदिनाथ साळवी आणि ॲड. वैशाली आदिनाथ साळवी आदी उपस्थित होते.
यावेळी ज्योतिर्विद कै. म. दा. भट, कै. काकासाहेब अवचट, कै. श्रीकृष्ण जकातदार, कै. ज्योतींद्र हसबे, कै.श्री. श्री. भट, कै. श्री. के. केळकर आणि कै. जयसिंगराव चव्हाण यांचा मरणोत्तर विधिलिखित ज्योतिष महर्षी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच वसंत दामोदर भट, चंद्रकांत शेवाळे, श्रीमती प्रतिभा शाहू मोडक आणि वि. शं. अष्टेकर यांचा विधिलिखित ज्योतिष महर्षी पुरस्कार देऊन यावेळी गौरव करण्यात आला.
जगात राहणाऱ्या प्रत्येकाला चिंता असते, उद्या काय होणार याची. मोठे मोठे नेते आपल्याला निवडणुकीचे तिकीट मिळणार की नाही, याची चिंता करत असतात. पण आपण कर्म करत राहा, गीतेमध्ये देखील हे वचन सांगण्यात आले आहे. आपले भाग्य निश्चित असले तरी चांगले कर्म करून त्यामध्ये बदल घडवता येऊ शकतो. मला इंजिनयर व्हायचे होते, मला होता आले नाही, पण मी अभिनेता झालो. मला इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळाला नाही, त्यानंतर बीएस सी, एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आणि अभिनेता झालो. माझ्या नशिबात अभिनेता होणे लिहिले होते. पुण्यातल्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये मी दोन वर्ष राहिलो असल्याचे सांगताना, आता तेव्हाचे पुणे राहिलेले नाही, इथली वाहतूक आणि अन्य प्रश्न बदलत gगेले आहेत असे खन्ना यावेळी म्हणाले.
अभिनेता म्हणून काम करताना मला मुलांसाठी शक्तिमान आणि मोठ्यासाठी भीष्मपितामह अशा दोन भूमिका करण्याची संधी मिळाली. अटलबिहारी वायपेयीं यांच्या काळात प्रचार करताना तशा प्रकारचा उल्लेख देखील व्हायचे अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. या दोन भूमिकांमुळे मी प्रसिद्ध असलो तरी ईश्वराच्या इच्छेनुसार सगळे होत असते, आपण जो श्वास घेतो तो देखील त्याच्यामुळेच हे सांगताना आपण कृतज्ञ असायला हवे, आपण एक शरीर नाही तर आत्मा आहोत, याचे भान आपण ठेवायला हवे, हे सांगताना त्यांनी शक्तिमान मधील अनुभव सांगितला.
आपण कधीच कोणाच्या पुढे हात पसरले नाहीत, कुणाच्या पाय पडून, उलटे सुलटे काम करून काम मागितले नाही. जेव्हा तुम्ही सरळ मार्ग निवडता तेव्हा तुम्हाला कोणताही ताण येत नाही उलट सहज सुखाची झोप लागते, ज्या व्यक्तीला सुखाची झोप येते तो खरा श्रीमंत आहे. ज्योतिषशास्त्र काय आहे, हे आपल्याला जाणून घेण्याची इच्छा असल्याचे सांगतानाच आपण आतापर्यंत आपला हात कधीच कोणाला दाखवलेला नसल्याचे खन्ना यांनी यावेळी सांगितले.
आपल्याला शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी ज्योतिषशास्त्रामुळे मिळाली असल्याची भावना आदिनाथ साळवी यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले, ज्योतिषशास्त्रामुळे आपल्याला नावलौकिक मिळाला, प्रतिष्ठा मिळाली आणि एक शक्ती प्राप्त झाली. या शास्त्रामुळे मार्ग सापडला. ज्योतिषशास्त्रामुळे आपल्या लौकिकात सातत्याने भर पडत असते त्यामुळे कृतज्ञता म्हणून आपण ज्योतिष शास्त्रातील मान्यवरांचा विधिलिखित ज्योतिष महर्षी पुरस्काराने सन्मान करीत आहोत असे साळवी यावेळी म्हणाले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम