भारतीय सैन्य दलातील जवानाची सायबर फसवणूक; मोबाईल हॅक करून आठ लाखांची रक्कम लंपास

बातमी शेअर करा...

भारतीय सैन्य दलातील जवानाची सायबर फसवणूक; मोबाईल हॅक करून आठ लाखांची रक्कम लंपास

जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय सैन्य दलातील जवानाचा मोबाईल हॅक करून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ८ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, जवानाच्या नावावर सात लाख ४३ हजार रुपयांचे ऑनलाइन कर्ज मंजूर करून, त्यातील संपूर्ण रक्कम सायबर गुन्हेगाराने परस्पर दुसऱ्या खात्यात वळती केली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय चिंधा राजपूत (वय ४०, रा. चाळीसगाव) असे फसवणूक झालेल्या जवानाचे नाव आहे. ते भारतीय सैन्य दलात शिपाई पदावर कार्यरत असून सध्या जम्मूतील रामबण येथे नियुक्त आहेत. जून महिन्यात त्यांच्याशी एका अनोळखी इसमाने संपर्क साधत “कर्ज पाहिजे का?” असे विचारले होते. राजपूत यांनी स्पष्ट नकार दिला. तरीही, त्यांचा मोबाईल हॅक करून १३ जून रोजी त्यांच्या स्टेट बँक खात्यावर सात लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज जमा करण्यात आले.

यानंतर, १३ ते २८ जून या काळात सायबर गुन्हेगाराने विविध व्यवहार करून एकूण आठ लाख पाच हजार रुपये काढून घेतले. यामध्ये कर्जरक्कम व त्यांच्या खात्यातील अन्य शिल्लक रक्कम देखील समाविष्ट होती. विशेष म्हणजे, हे व्यवहार घडत असताना राजपूत यांच्या मोबाईलवर कोणताही एसएमएस अलर्ट आला नाही.

राजपूत यांच्या मोबाईलमध्ये बँकेचे अ‍ॅप इन्स्टॉल असून, त्यावरून ते नियमित व्यवहार करतात. सायबर गुन्हेगाराने मोबाईलचा रिमोट अॅक्सेस मिळवून, बँकेच्या अ‍ॅपद्वारे कर्ज घेतले आणि रक्कम वळती केली. १ जुलै रोजी त्यांच्या खात्यातून १३,१३६ रुपये वजा झाल्याचा मेसेज आल्यावर त्यांना संशय आला. सुटी घेऊन ते चाळीसगाव येथे आले व स्टेट बँक शाखेत चौकशी केली असता आपल्याच नावावर कर्ज घेतल्याचे व त्याचे हप्ते वजावले जात असल्याचे उघड झाले.

सध्या सायबर फसवणुकीचे प्रकार झपाट्याने वाढत असून, यामध्ये मोबाईलचा रिमोट अॅक्सेस, एसएमएस हायजॅकिंग, फसवणूक करणारे अ‍ॅप्स आणि लिंक क्लिक करून फोन हॅक करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, मोबाईलमध्ये थर्ड पार्टी अ‍ॅप्स टाळावेत आणि सायबर सुरक्षेसाठी अपडेटेड अँटीव्हायरस वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम