
भुलाबाई महोत्सव २०२५ : जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन
भुलाबाई महोत्सव २०२५ : जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन
जळगाव : केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनी तर्फे दरवर्षी भव्य स्वरूपात साजरा होणारा भुलाबाई महोत्सव यंदा २४ व्या वर्षात पदार्पण करत असून २०२५ मध्ये अधिक व्यापक स्वरूपात आयोजित होत आहे. प्रथमच या महोत्सवाची तालुकास्तरीय पातळीवर विस्तृत आखणी करण्यात आली असून सात तालुक्यांमध्ये प्राथमिक फेरी होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे दहा हजार महिला व तरुणींच्या सहभागातून लोकसंस्कृतीचे दर्शन घडणार आहे.
भुलाबाई ही महाराष्ट्रातील पारंपरिक लोकपरंपरेतील महत्त्वाची लोकदेवता असून महिलांमध्ये सामाजिक ऐक्य, कला आणि भक्तीभाव जागवणारी ही परंपरा आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी आणि लोकपरंपरेतील गीतांचा प्रसार व्हावा हा महोत्सवाच्या आयोजनामागील हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
महिलांच्या आत्मीयतेचा आणि लोकपरंपरेचा उत्सव असलेल्या या महोत्सवात विजेत्या संघांना पारितोषिके व सहभागींना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. यावेळी भुलाबाईची पालखी सोहळाही आयोजित करण्यात येणार आहे. तालुकास्तरीय फेरीतील विजेत्यांना जिल्हास्तरीय महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल. हा अंतिम सोहळा रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी भैय्यासाहेब गंधे सभागृह, ला. ना. शाळा, जळगाव येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत होणार आहे.
स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटात होणार असून प्रत्येक गटात १२ ते १५ मुली सहभागी होतील. भुलाबाईच्या गाण्यांसोबतच चालू घडामोडींवरील समाजोपयोगी संदेश असलेल्या सादरीकरणांना प्राधान्य दिले जाणार आहे. विजेत्या संघांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील. सर्व सहभागींना प्रमाणपत्रांसह आयोजकांतर्फे प्रसाद स्वरूपात खाऊ देण्यात येईल.
तालुकास्तरीय महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. २४ ऑगस्ट रोजी चाळीसगाव येथे रंगगंध कला सक्त न्यास यांच्या सहयोगाने, ३ सप्टेंबर रोजी सावदा येथे गोदावरी फाउंडेशनच्या सहयोगाने, ५ सप्टेंबर रोजी जामनेर येथे गिरीश महाजन फाउंडेशनच्या सहयोगाने, ७ सप्टेंबर रोजी पाचोरा येथे अखिल भारतीय ब्राह्मण समाज महिला संघाच्या सहयोगाने, ८ सप्टेंबर रोजी चोपडा येथे भगिनी मंडळाच्या सहयोगाने तसेच त्याच दिवशी भुसावळ येथे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सहयोगाने आणि ९ सप्टेंबर रोजी भडगाव येथे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ युवा फाउंडेशनच्या सहयोगाने स्पर्धा पार पडतील.
“भुलाबाई महोत्सव हा केवळ सांस्कृतिक सोहळा नसून महिला सबलीकरण, लोकसंस्कृती संवर्धन आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महोत्सव यशस्वी करावा,” असे आवाहन आयोजक संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम