भुसावळमध्ये आरपीएफची मोठी कारवाई; गांधीधाम एक्स्प्रेसमधून ४२ किलो गांजा जप्त

बातमी शेअर करा...

भुसावळमध्ये आरपीएफची मोठी कारवाई; गांधीधाम एक्स्प्रेसमधून ४२ किलो गांजा जप्त

भुसावळ: रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) ‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत केलेल्या धडक कारवाईत गांधीधाम एक्स्प्रेसमधून तब्बल ४२ किलो २८० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत सुमारे साडेआठ लाख रुपये असून, या प्रकरणी ओडिशातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मंगळवार, २ सप्टेंबर रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली.

गांधीधाम एक्स्प्रेसमधून गांजाची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ सुरक्षा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ, जीआरपी (सरकारी रेल्वे पोलीस) आणि श्वान पथकाचे एक संयुक्त पथक तयार करण्यात आले.

गाडी भुसावळ स्थानकावर येताच, पथकाने श्वान ‘वीरू’च्या मदतीने तपासणी सुरू केली. सुरुवातीला काहीही संशयास्पद आढळले नाही, त्यामुळे पथकाने गाडीचा तपास जळगावपर्यंत सुरू ठेवला. दरम्यान, कोच एस-५ मध्ये तीन संशयित व्यक्ती त्यांच्या बॅगांसह पोलिसांना दिसले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.

त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या बॅगा तपासल्या असता, त्यात खाकी टेपने गुंडाळलेली एकवीस पाकिटे आढळून आली. जळगाव स्थानकावर पंचांच्या उपस्थितीत या पाकिटांचे वजन केले असता, त्यात ४२ किलो २८० ग्रॅम गांजा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गांजासोबतच तीन मोबाईल फोनही जप्त केले.

या प्रकरणी नलूमालु जसवंत डोरा (२५), विप्रप्रकाश विद्याधर सेठी (१९) आणि अलक सुभाषचंद्र बारीक (२५, तिघे रा. गंजम, ओडिशा) यांना अटक करण्यात आली आहे. जीआरपी भुसावळने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम