
भुसावळमध्ये बेकायदेशीर बांधकाम, धमक्यांमुळे नागरिक संतप्त
भुसावळमध्ये बेकायदेशीर बांधकाम, धमक्यांमुळे नागरिक संतप्त
अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ; २६ जानेवारीला ‘उपोषणचा इशारा
जळगाव प्रतिनिधी भुसावळ शहरातील सर्वे क्र. 115/1/अ, प्लॉट क्र. 9 येथे मंजूर नकाशाला विरोधात केलेल्या बांधकामामुळे निर्माण झालेल्या तफावती, पार्किंग रस्त्याच्या अडथळ्यांबाबत तसेच धमक्या मिळाल्याच्या प्रकारामुळे नागरिक प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीची कार्यवाही करण्याची मागणी करत लेखी निवेदन दिले आहे.
मंजूर नकाशापेक्षा वेगळे बांधकाम?
निवेदनात म्हटले आहे की भूसावळ उपविभागीय कार्यालय व नगररचना विभाग, जळगाव यांनी संबंधित प्लॉटला Completion Certificate (CC) दिले असले तरी प्रत्यक्ष जागेवर मंजूर नकाशानुसार बांधकाम झालेले नाही. पार्किंगसाठी मंजूर असलेला बाहेर निघण्याचा रस्ता प्रत्यक्षात नसल्याने परिसरात गंभीर वाहतूक व पार्किंग समस्या निर्माण झाल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे.
अनियमिततेला कोण जबाबदार?
या प्रकरणात संबंधित अधिकारी आणि बिल्डिंग मालक यांच्या संगनमताने बेकायदेशीर बांधकाम करण्यात आल्याचा गंभीर आरोप अर्जदाराने केला आहे. पत्र क्रमांक 142 चे उल्लंघन झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
धमक्याचे प्रकार?
अर्जदार प्रमोद पाटील यांनी सांगितले की, त्यांनी या प्रकरणात आक्षेप नोंदविल्यानंतर बिल्डिंग मालक, त्यांची मुले आणि 5–6 तरुण घराबाहेर येऊन गलिच्छ शिवीगाळ व जीवाची धमकी देत असल्याचा धक्कादायक दावा त्यांनी निवेदनात केला आहे.
या संदर्भात त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात लेखी NC दाखल केली आहे.तसेच, “माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवितास काहीही अपघात अथवा इजा झाली तर त्यास संबंधित अधिकारी, बिल्डिंग मालक आणि त्यांचे साथीदार जबाबदार राहतील,” असे त्यांनी निवेदनात आहे.
अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
सदर अनियमिततेबाबत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी अर्जदाराने केली आहे.
२६ जानेवारीला ‘उपोषणचा इशारा
या प्रकरणात तत्काळ कार्यवाही न झाल्यास २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याची इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे. तसेच, सर्वे क्र. 115/1/अ, प्लॉट क्र. 9 या जागेवर कोणताही रिव्हाईज्ड प्लॅन, पुनर्विकास किंवा अन्य मंजुरीची प्रक्रिया सुरु करू नये अशीही विनंती केली आहे.
प्रमोद पाटील यांनी दिलेल्या या गंभीर निवेदनामुळे सदर बांधकामातील अनियमितता व धमक्या या दोन्ही मुद्द्यांवर जिल्हा प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम