भुसावळात गोळ्या झाडून तरुणाचा खून करणाऱ्या पाच जणांना अटक
चार गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतूस हस्तगत ; एलसीबी आणि बाजारपेठ पोलिसांची कारवाई
भुसावळात गोळ्या झाडून तरुणाचा खून करणाऱ्या पाच जणांना अटक
चार गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतूस हस्तगत ; एलसीबी आणि बाजारपेठ पोलिसांची कारवाई
भुसावळ I प्रतिनिधी
भुसावळ शहरात २३ महिन्यांपूर्वी झालेल्या खून प्रकरणाचा बदला घेण्यासाठी १० जानेवारी रोजी शहरातील जाम मोहल्ला भागात आलेल्या एका तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी चार जणांना मनमाड तर एकाला बल्लारशाह येथून अटक केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी पत्र परिषदेत दिली .
भुसावळातील शरीर सौष्ठवपटू अफाक पटेलची हत्या करण्यात आल्यानंतर या गुन्ह्यातील प्रमुख संशयीत असलेल्या तेहरीन नासीर शेख (27) या तरुणाचा शुक्रवार, १० जानेवारी रोजी सकाळी 7.20 वाजता गोळीबार करून खून करण्यात आला होता. खून प्रकरणी बल्लारशाह येथून सलमान अब्दुल माजीद पटेल उर्फ रमीज पटेल (32, पटेल कॉलनी, खडका रोड, भुसावळ) यास जळगाव गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली तर या गुन्ह्यातील प्रमुख चार आरोपींना भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मनमाडजवळून अदनान शेख युनूस (29, आगाखान वाडा, भुसावळ), शेख साहील शेख रशीद (21, आगाखान वाडा, भुसावळ), अब्दुल नबी हनीफ पटेल (31, शेरा चौक, मास्टर कॉलनी, जळगाव), सनीस नाईन मोहम्मद आसीफ (19, एमआयडीसी एरिया, जळगाव) यांना अटक केली.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणातून शरीर सौष्ठवपटू अफाफ अख्तर पटेल हा खडका रोडवरील अलिया कोल्डींक्सच्या दुकानात बसला असताना त्याच्यावर शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता व उपचारादरम्यान बुधवार, ८ फेब्रुवारी २०२३ रोजी तरुणाचा मृत्यू झाला होता. या खून प्रकरणातील प्रमुख संशयीत असलेला तेहरीन नासीर शेखहा शहरातील जाम मोहल्ला चौकातील चहाच्या दुकानात शुक्रवार, १०जानेवारी रोजी सकाळी चहा पिण्यासाठी आल्यानंतर संशयीत तन्वीर मजीद पटेल, अन्वर पटेल, रमीज पटेल, शेख साहील शेख रशीद यांनी अश्लील शिविगाळ करीत ‘तुने हमारे भाई को पिछले साल मारा था, अब तेरा खेल खतम’‘ म्हणत तीन गोळ्या झाडल्या होत्या. तेहरीनचा जागीच मृत्यू झाला होता. हल्ल्यानंतर संशयीत विना क्रमांकाच्या दुचाकीवरून पसार झाले होते.
या गुन्ह्यातील संशयीत असलेल्या सलमान अब्दुल माजीद पटेल उर्फ रमीज पटेल (32, पटेल कॉलनी, खडका रोड, भुसावळ) यास जळगाव गुन्हे शाखेने बल्लारशहा, जि.चंद्रपूर येथून शनिवारी अटक केली होती. संशयीताला रविवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार कमलाकर बागुल, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे, हवालदार सोमवंशी, सचिन पोळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपींकडून पोलिसांनी प्रत्येकी २५ हजार रुपये किंमतीचे चार गावठी कट्टे, तीन हजार रुपये किंमतीचे तीन जिवंत काडतूस तसेच एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली. ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, सहा.निरीक्षक अमितकुमार बागुल, उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजु सांगळे, उप निरीक्षक मंगेळ बेंडकाळी, हवालदार विजय नेरकर, हवालदार रमण सुरळकर, हवालदार उमाकांत पाटील, हवालदार महेश चौधरी, हवालदार अनवर शेख, हवालदार निलेश चौधरी, नाईक अतुल पवार, नाईक सोपान पाटील, शिपाई प्रशांत परदेशी, जावेद शहा, भूषण चौधरी, योगेश माळी, राहुल वानखेडे, हर्षल महाजन आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम